वाशी, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने स्वखर्चाने एक अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ३१ मार्चपर्यंत ही सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शहराच्या विविध भागांत एकूण १,५२४ कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी १४११ कॅमेऱ्यांची प्रत्यक्ष उभारणी पूर्ण झाली आहे, पण सद्यःस्थितीत १,०४३ कॅमेरे पूर्णपणे कार्यरत आहेत. मात्र, उर्वरित ३६८ कॅमेरे सध्या तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे अनेक ठिकाणी फायबर केबल्स तुटल्या आहेत, तर काही ठिकाणी वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्व बंद कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे, हे कॅमेरे केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानाचा भाग नसून, महापालिकेने आपल्या स्वतःच्या निधीतून ही यंत्रणा उभारली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यात अत्यंत उच्च दर्जाची मानके राखण्यात आली आहेत. स्पष्ट चित्रीकरणासाठी यामध्ये ‘हाय-डेफिनेशन’ रिझोल्यूशन आणि आधुनिक लेन्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच, रात्रीच्या वेळी किंवा अत्यंत कमी प्रकाशातही गुन्हेगारांच्या हालचाली स्पष्टपणे टिपण्यासाठी या कॅमेऱ्यांमध्ये प्रगत ‘इन्फ्रारेड’ आणि ‘लो-लाइट’ सेन्सर्सची सुविधा देण्यात आली आहे.
आयआयटी मुंबईकडून प्रमाणपत्र
बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाचा पहिला मजला आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तालय अशा दोन ठिकाणांहून शहराच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवले जात आहे. यामुळे पोलिस दलाला गुन्हे शोधण्यासाठी आणि वाहतुकीचे नियमन करण्यासाठी मोठी मदत होत आहे. या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड या कंपनीने निविदेतील सर्व अटी व तांत्रिक निकषांची पूर्तता केल्याचे प्रमाणपत्र आयआयटी मुंबईने दिले आहे. महापालिकेच्या या पुढाकारामुळे नवी मुंबई शहर आता अधिक सुरक्षित होणार असून, सीसीटीव्हीच्या या तिसऱ्या डोळ्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.