तरुणाचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू
१२ वर्षांनी पाच डॉक्टरांविरोधात गुन्हा
मुंबई, ता. २२ : चित्रपटसृष्टीत ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूस जबाबदार धरत तब्बल १२ वर्षांनी गोवंडी, चेंबूर येथील दोन खासगी रुग्णालयांतील पाच डॉक्टरांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.२१) गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलेनियम हॉस्पिटलचे डॉ. नियाज अहमद खान, डॉ. इम्तियाज अहमद खान, डॉ. उमेश पिंपळे व साई ग्रुप ऑफ हॉस्पीटलचे डॉ. खालीद, डॉ. अमित शोभावत यांच्यावर निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. गोवंडीत राहणाऱ्या नसीमबानू शाह (५७) यांचा मुलगा सलमान याचा एप्रिल २०१४ मध्ये एका हिंदी मालिकेच्या चित्रीकरणावरून परतत असताना वसई येथे अपघात झाला होता. स्थानिक रुग्णालयाने त्याच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर असून शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला दिला. कुटुंबाने सलमानला सुरुवातीला गोवंडीतील मिलेनियम रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र नसीमबानू यांच्या आरोपानुसार सलमानच्या अपघाताबाबत पोलिसांना कळवू नये, असे डॉक्टरांनी बजावले होते. शस्त्रक्रिया सुरू असताना तब्बल अर्धा तास रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शस्त्रक्रियेनंतर सलमानची तब्येत सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. तिसऱ्या दिवशी तो बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याला साई रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
आईच्या पाठपुराव्याला यश
आई नसीमबानू यांनी तातडीने दोषी डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी सुरू केली. पोलिस ठाणे, महापालिका आदी सर्व यंत्रणांकडे त्यांनी पाठपुरावा सुरू केला; मात्र आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयांनी सलमानवरील उपचारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे न दिल्याने चौकशी लांबली. अखेर काही दिवसांपूर्वी जे. जे. रुग्णालयाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्याआधारे शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.