रखडलेल्या दुबे रुग्णालयाचे काम अखेर सुरू
मुख्याधिकाऱ्यांचे आदेश; महिनाभरात नूतनीकरण पूर्ण होणार
मोहिनी जाधव; सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २३ : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या दुबे रुग्णालयातील गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले नूतनीकरणाचे काम अखेर पुन्हा सुरू झाले आहे. रुग्णांची होणारी प्रचंड गैरसोय आणि अपुऱ्या जागेत उपचार घेताना सोसावे लागणारे हाल याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठवल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी कंत्राटदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले असून, महिनाभरात रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
रुग्णालयाचे काम बंद असल्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अत्यंत कोंदट आणि अपुऱ्या जागेत रुग्णांची तपासणी करावी लागत होती. यामुळे उपचारांत अडथळे येत होते आणि रुग्णांनाही ताटकळत राहावे लागत होते. ‘सकाळ’ने या समस्येवर सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कंत्राटदाराने कामाला गती दिली असून, प्रलंबित असलेल्या खोल्यांची बांधणी, रुग्णालयातील वायरिंग आणि प्रकाशव्यवस्था, प्लॅस्टर आणि रंगकामासह इतर अंतर्गत सोयी अशी कामे पूर्ण केली जात आहेत. पुढील ३० दिवसांत हे काम पूर्ण करून अद्ययावत सुविधांसह रुग्णालय बदलापूरकरांच्या सेवेसाठी खुले होणार आहे. दररोज उपचार घेणाऱ्या शेकडो रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. वेळेत दखल घेतल्याबद्दल रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड तसेच ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
रुग्णांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. नूतनीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण आणि दिलेल्या मुदतीत (एका महिन्यात) पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश ठेकेदाराला दिले आहेत.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव-बदलापूर नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.