३९ तास पाण्याविना हाल
मिरा-भाईंदरचा पुरवठा ठप्प, मुख्य जलवाहिनीला गळती
भाईंदर, ता. २३ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर शहराला पाणी पुरवणाऱ्या स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा तब्बल ३९ तास ठप्प झाल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात तब्बल तीन दिवस नागरिकांना पाणी मिळाले नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागला.
मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या घोडबंदर हटकेश रस्त्यावरील मुख्य जलवाहिनीला शुक्रवारी (ता. २०) रात्री १२.३०च्या सुमारास गळती लागली होती. वाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (ता. २१) संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण झाले; पण चेणा येथील जुन्या पुलाजवळ स्टेम प्राधिकरणाचीच जलवाहिनी नादुरुस्त झाली. त्यामुळे रविवारी (ता. २२) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे ३९ तास स्टेमचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. रविवारी दुपारी ३.१५ वाजता शहराचा पुरवठा सुरू झाला; मात्र तोपर्यंत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते.
-----------------------
पुढील दोन दिवस मनस्ताप
काही दिवसांपूर्वीच महापौर डिंपल मेहता यांनी शहरात पाणीटंचाई होऊ नये, यासाठी स्टेम, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून देखभाल दुरुस्तीसाठी शट डाऊनची संख्या कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. महत्त्वाचे म्हणजे, आणखी दोन दिवस नागरिकांना पाणी कमी दाबाने होणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
--------------------------
टँकरवर भिस्त
मिरा-भाईंदरला स्टेमकडून दररोज ८५ दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून ११७ दशलक्ष पाणीपुरवठा होतो. यातील एका स्रोताचे पाणी २४ तास उपलब्ध झाले नाहीतर शहरात दोन ते तीन दिवस पाणीटंचाई निर्माण होते. पाणीपुरवठा नियमित सुरू असताना नागरिकांना दर ४० तासांच्या फरकाने पाणी मिळत होते; मात्र जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे हा फरक तब्बल ८० तासांवर गेल्याने नागरिकांना टँकरचे पाणी मागवावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.