भिवंडी, ता. २३ (वार्ताहर) : जागतिक परिस्थितीमुळे गॅस टंचाईची समस्या उद्भवत असतानाही सरकार, पालिका प्रशासन आणि भारत गॅस यांच्या समन्वयातून अक्षयपात्र किचनला गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना वेळेवर सकस मध्यान्ह भोजन देणे शक्य होत असल्याची माहिती ऑपरेशन हेड दत्तात्रय गाडे यांनी दिली.
भिवंडी महापालिका क्षेत्रातील १०४ प्राथमिक शाळा आणि अनुदानित खासगी शाळांमधील सुमारे २१ हजार विद्यार्थ्यांना २०२२ पासून दररोज शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले सकस, स्वच्छ आणि पौष्टिक मध्यान भोजन पुरवले जात आहे. अन्न विद्यार्थ्यांच्या ताटात पोहोचेपर्यंत त्यातील पोषक तत्त्वे आणि गुणवत्तेची काळजी काटेकोरपणे घेतली जाते. सरकारच्या धोरणानुसार १२ प्रकारचे मेनू निश्चित करण्यात आले असून, विविध प्रकारचे पुलाव विद्यार्थ्यांना दिले जातात. सुका पुलाव बेचव वाटू नये म्हणून त्यासोबत करीही दिली जाते. तसेच परीक्षा कालावधीत डिसेंबरपासून शेंगदाणा-राजगिरा चिक्की व विविध फळे देऊन विद्यार्थ्यांच्या पोषणाची विशेष काळजी घेतली जाते.
‘अक्षयपात्र’चा देशभरात ५० लाखांचा टप्पा पार
इस्कॉनअंतर्गत बेंगळुरू येथील ‘अक्षयपात्र फाउंडेशन’तर्फे ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या अक्षयपात्र किचनच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या उपक्रमातून देशभरात ५० लाख विद्यार्थ्यांना भोजन देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच पार करण्यात आला आहे. १७ मार्चला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत याचा सोहळा साजरा करण्यात आला.
अन्नाच्या गुणवत्तेची काळजी
अन्नाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जात नसून, स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. धान्य, डाळी, पालेभाज्या यांची तपासणी करूनच वापर केला जातो. भांड्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते, तसेच तयार अन्नाचे नमुने तीन दिवस सुरक्षित ठेवले जातात. विद्यार्थ्यांपर्यंत अन्न पोहोचेपर्यंत ते गरम राहावे यासाठी तापमान तपासणी केली जाते. किचनचे दर दोन महिन्यांनी परीक्षण केले जाते. किचनमध्ये स्वतंत्र अन्न तपासणी प्रयोगशाळा आहे. सर्व कच्च्या मालाची तपासणी केल्यानंतरच वापर केला जातो, अशी माहिती प्रयोगशाळा प्रमुख अंकिता कामनवर यांनी दिली.
अन्न वितरण
शहरातील विविध भागांतील शाळांमध्ये वेळेवर भोजन पोहोचावे यासाठी १५ मार्ग निश्चित करण्यात आले आहे. आठ टेम्पोच्या माध्यमातून अन्न वितरण केले जाते. आजपर्यंत हा उपक्रम नियमित व यशस्वीपणे सुरू असून, मध्यान भोजनाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, अशी माहिती पराग गोणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.