आर्थिक शिस्तीतून विकासाचा मार्ग
ठाणे पालिकेचा सहा हजार २२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी (ता. २३) आगामी आर्थिक वर्षाचा ६,२२१ कोटी १२ लाखांचा मूळ अर्थसंकल्प महासभेत सादर केला. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ लादण्यात आलेली नाही. नवीन प्रकल्पांपेक्षा जुन्या आणि राज्य सरकारच्या प्रकल्पांना गती देण्यावर यात भर देण्यात आला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा आहे. यंदाचा मूळ अर्थसंकल्प ६,२२१.१२ कोटींचा असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात १०.२१ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. पालिकेने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यापेक्षा जुन्या यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर भर दिला आहे. २०२५-२६चे सुधारित अंदाज ७,०८९ कोटींपर्यंत पोहोचले असून, नवीन वर्षात आर्थिक शिस्त पाळून विकासकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
शहराचा भौतिक विकास होत असतानाच नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी या तीन क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी आणि इतर नागरी आरोग्य केंद्रांसाठी सुमारे २०० कोटींहून अधिकची तरतूद आहे. नवीन वैद्यकीय उपकरणांची खरेदी आणि आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण केले जाईल. तसेच ग्रीन बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभारून शहरात वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि सौरऊर्जेचा वापर वाढवण्याचे नियोजन आहे. यासाठी सुमारे ₹३१ कोटींहून अधिकचा भांडवली खर्च प्रस्तावित आहे.
डिजिटल कर आकारणी
करवसुलीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने डिजिटल क्रांतीवर भर दिला आहे. कर आकारणीत मानवी हस्तक्षेप कमी करून ती पूर्णपणे संगणकीकृत केली जाईल, जेणेकरून चुकांना वाव राहणार नाही. आता ठाणेकरांना त्यांच्या मालमत्ता कराचे बिल आणि माहिती व्हॉट्सॲपवर एका क्लिकवर उपलब्ध होईल. तसेच घरबसल्या कर भरण्यासाठी प्रगत ई-बिलिंग सॉफ्टवेअर आणि इंटरफेस विकसित करण्यात येणार आहे.
शाळांचा कायापालट
महापालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आयुक्तांनी शिक्षणावर मोठी तरतूद केली आहे. पालिका शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल बोर्डचा वापर वाढवण्यात येईल. शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि मुलांसाठी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची उत्तम सोय यासाठी विशेष निधी राखून ठेवला आहे. केवळ इमारतीच नाही तर शिक्षणाचाही दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातील.
अर्थसंकल्पाची प्रमुख उद्दिष्टे
आर्थिक शिस्त आणि महसुली उत्पन्न वाढीवर विशेष भर
पीपीपी तत्त्वावरील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणे
जमिनीवरील कर आकारणी पद्धतीत सुधारणा (प्लॉट क्षेत्रफळावर आकारणी)
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष कल्याणकारी योजना
हरित ठाणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ग्रीन बॉन्ड्सद्वारे निधी उभारणे
जमा आणि खर्चाचा ताळेबंद (कोटी रुपयांत)
उत्पन्न स्रोत (जमेचा रुपया) रक्कम (कोटी) हिस्सा (पैशात)
महापालिका स्वउत्पन्न २३७६.०० ३८
वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क १७०२.०० २७
आरंभीची शिल्लक १६५२.०० २७
इतर अनुदाने व कर्जरोखे ४९०.९२ ८
एकूण जमा ६,२२१.१२ १००
खर्चाचा तपशील (खर्चाचा रुपया) रक्कम (कोटी रुपयांत) हिस्सा (पैशात)
भांडवली खर्च (विकासकामे) २,४०१.५५ ३९
वेतन व भत्ते १,७१६.७४ २८
यंत्रणा कार्यान्वयन व खरेदी १,३२९.२९ २१
प्रशासकीय व इतर खर्च ४२३.१५ ७
देखभाल-दुरुस्ती व इतर योजना ३४९.०० ५
एकूण खर्च ६,२१९.७२ १००
....................................................
प्रमुख विभागांसाठीची तरतूद (भांडवली + महसुली खर्च)
सार्वजनिक बांधकाम : सर्वाधिक १,८४२ कोटी (रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी)
घनकचरा व्यवस्थापन : ६४८ कोटी
पाणी पुरवठा : ४४८ कोटी
शिक्षण व आरोग्य : सुमारे ८०० कोटींहून अधिक एकत्रित तरतूद
परिवहन सेवा : २९० कोटी.
अर्थसंकल्प विभागनिहाय खर्च (कोटीत)
विभाग भांडवली खर्च महसुली खर्च एकूण तरतूद
सार्वजनिक बांधकाम १७४८.२७ ९४.१० १८४२.३७
घनकचरा व्यवस्थापन ११४.७२ ५३३.४७ ६४८.१९
पाणीपुरवठा ५३.०७ ३९५.३७ ४४८.४४
शहर विकास योजना ५१.८९ ३५८.३२ ४१०.२१
शैक्षणिक गुणवत्ता १.०८ ३६३.१९ ३६४.२७
परिवहन सेवा ००.०० २९०.०० २९०.००
आरोग्य सुविधा १४.१० २०९.४६ २२३.५६
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय १४.४० १९४.९९ २०९.३९
विद्युत विभाग ५१.३७ ९४.२२ १४५.५९
मलनिस्सारण ७२.०८ ७४.४३ १४६.५१
हरित ठाणे ३१.२५ ५२.६३ ८३.८८
अग्निशमन विभाग १.७५ ६०.२७ ६२.०२
पर्यावरण संवर्धन ३७.०८ ७.७३ ४४.८१
महिला, ज्येष्ठ व दिव्यांग कल्याण ००.०० ३९.४६ ३९.४६
क्रीडा विभाग ४.८५ २४.६० २९.४५
माहिती व तंत्रज्ञान १०.५० ३.५६ १४.०६
................................................................
उत्पन्नाचे स्रोत
स्वउत्पन्न : २,३७६ कोटी (३८%)
जीएसटी व मुद्रांक शुल्क अनुदान : १,७०२ कोटी (२७%)
आरंभीची शिल्लक : १,६५२.२० कोटी (२७%)
अनुदाने व कर्ज : ४९०.९२ कोटी (८%)