सर्वांगीण विकासाचा रोड मॅप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३: ठाणे महानगरपालिकेने आगामी वर्षांसाठी शहराच्या सर्वांगीण विकासाचा ''रोडमॅप'' तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी असून अर्थसंकल्पामध्ये १८४२ कोटी ३७ लाख रुपये अपेक्षित खर्च दाखवण्यात आला आहे.
प्रशासकीय आणि शैक्षणिक क्रांती
ठाणे शहराच्या वाढत्या व्यापाचा विचार करून माजिवडा येथे ३२ मजली नवीन भव्य प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. यासाठी साधारण ७२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून डिसेंबर २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच, खिडकाळी येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ''हायब्रीड स्किल युनिव्हर्सिटी'' आणि ''आयसीटी'' (ICT) चे संशोधन केंद्र उभारले जाणार असून, यासाठी शासनाकडून विनामूल्य जागा प्राप्त झाली आहे.
आरोग्यावर विशेष लक्ष
शहरातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ४४ ठिकाणी पोर्टा कॅबिन स्वरूपातील ''नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे'' उभारली जात आहेत. विशेष म्हणजे, कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थलांतर करून तिथे ३५० अतिरिक्त खाटांचे रुग्णालय आणि सुसज्ज वसतिगृह उभारण्यासाठी १३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पर्यटन आणि पर्यावरण
ठाणेकरांच्या मनोरंजनासाठी अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प राबवले जाणार आहेत:
कोळशेत बर्ड एव्हरी (पक्षीगृह): १० कोटी खर्चून ५०,३०० चौ.मी. क्षेत्रात हे पक्षीगृह उभारले जाईल.
ओवळा माजिवडा येथे डिजिटल ॲक्वेरियम: बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात हे अत्याधुनिक मत्स्यालय असेल.
ठाणे टाऊन पार्क: कोळशेत व बाळकूम परिसरात ७५ एकरपेक्षा जास्त जागेवर ६९४ कोटी रुपये खर्चून निसर्गरम्य टाऊन पार्क विकसित केले जाणार आहे.
निसर्ग पायवाट (Nature Trail): वाघबीळ ते नागला बंदर दरम्यान ४ किमी लांबीची ''मॅन्ग्रोव्ह नेचर ट्रेल'' पर्यटकांना आकर्षून घेईल.
क्रीडा आणि संस्कृती
क्रीडा प्रेमींसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय दर्जावर विस्तार केला जाणार असून, घोडबंदर येथे ऑलिम्पिक साईजचे पोहण्याचे तलाव उभारण्यात येणार आहेत. तसेच, दिव्यात आगरी-कोळी आणि वारकरी भवन, तर वर्तकनगर येथे ''भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय'' उभारून सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे.
पायाभूत सुविधा आणि विकास
शहरी वाहतूक: ३२० चारचाकी आणि २४७ दुचाकी क्षमतेचे शाहू मार्केट येथे बहुमजली सार्वजनिक पार्किंग उभारले जाईल.
महिला सुरक्षा: भाईंदरपाडा येथे ४०६ महिलांच्या निवासासाठी सुसज्ज कामकाजी महिला वसतिगृह उभारले जाणार आहे.
स्मशानभूमी सुसूत्रीकरण: खिडकाळी आणि जवाहरबाग येथील स्मशानभूमींचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे (उदा. पीएनजी वाहिनी) नूतनीकरण केले जाईल.
थोडक्यात महत्त्वाचे:
प्रशासकीय भवन: ७२७ कोटी (३२ मजली)
क्रीडा संकुल (बोरिवडे): ७५ कोटी
मल्टिस्पेशालिटी रुग्णालय (मानपाडा): २१.६० कोटी
पार्किंग टॉवर (गडकरी रंगायतन जवळ): ५० कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.