अंतिम अहवाल का सादर केला नाही?
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राज्य सरकारला न्यायालयाने खडसावले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील याचिकेवर अंतिम अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारवर उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २३) ताशेरे ओढले. नवे पुरावे सापडले ही सबब सांगून अंतिम अहवाल सादर करणार नाही का? कायद्यानुसार तुम्ही २४ तासांत अहवाल सादर करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले.
दिशाच्या मृत्यूमागे कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न नाही. त्यामुळे दिशाच्या मृत्यूची अपघाती नोंद करून गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही, असा दावा करून मालवणी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे, प्राथमिक चौकशीचा अहवाल तयार असला तरीही चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. याचिकाकर्त्यांनी पेन ड्राइव्हच्या माध्यमातून काही नवे पुरावे दिले असून तपास यंत्रणा त्याची पडताळणी करीत असल्यामुळेच अंतिम अहवाल सादर केला नसल्याची माहिती सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाला दिली. त्यावरही नाराजी व्यक्त करून एक पेन ड्राइव्ह तपासण्याकरिता असा किती वेळ लागतो? सीआरपीसी १७४ नुसार नव्या पुराव्यांवर आधारित चौकशी अहवाल हा २४ तासांत दाखल व्हायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आणि एसआयटीचे तपास अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी सरकारी वकिलांनी पुन्हा मुदतवाढ देण्याची केलेली मागणी न्यायालयाने स्वीकारली आणि सुनावणी दोन आठवड्यांनी सूचिबद्ध केली.
..........................................................................
याचिकेत काय आहेत आक्षेप?
दिशाच्या आत्महत्येबाबत तिचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेत पाेलिस तपासावर गंभीर आक्षेप नाेंदवले आहेत. घाईगडबडीत अंत्यसंस्कार, सीसीटीव्ही फुटेज गायब, माेबाईल लाेकेशन, सीडीआर यांची नाेंद, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल बनावट तयार केल्या गेल्याचा दावाही सालियन यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.