शहर विकासासाठी ४१० कोटी
कोस्टल रोड, ट्विन टनेलसह पायाभूत प्रकल्पांना चालना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः ठाणे शहराच्या सर्वांगीण आणि सुनियोजित विकासासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात ४१० कोटी २१ लाख रुपयांची शहर विकास योजना प्रस्तावित केली आहे. यात कोस्टल रोड, ट्विन टनेल, हायस्पीड रेल्वे परिसर विकासासह वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर मोठा भर देण्यात आला आहे. आगामी काही वर्षांत ठाण्याच्या भौगोलिक आणि वाहतूक रचनेत मोठे बदल होऊन प्रवास सुपरफास्ट होण्यास मदत होणार आहे.
१२८.२३ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या ठाणे शहराचे ११ नियोजन प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६नुसार विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू असून, १९९९ चा आराखडा सुधारित करून सप्टेंबर २०२५ मध्ये शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अनेक प्रकल्प आकार घेणार असून त्या दृष्टीने ठाणे महापालिकेने तयारीला सुरुवात केली आहे.
डोमखार येथे तळमजला अधिक ४ मजले पोलीस ठाणे एप्रिल २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. दिवा येथे सप्टेंबर २०२६ पर्यंत पाच माजली रुग्णालय पूर्ण होणार आहे. तर मुंब्रा येथे ड्रामा थिएटर, मार्केट, टीएमटी वाहनतळ व कॉलेज मार्च २०२७ पर्यंत कार्यरत होणार आहेत. या प्रकल्पांमुळे उपनगरांमध्ये मूलभूत सुविधा मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाला गती
खारीगाव-बाळकुम ते गायमुख दरम्यान सुमारे १३.२१५ कि.मी. लांबीचा आणि ४० ते ४५ मीटर रुंदीचा कोस्टल रोड प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादन आणि पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, टीडीआरच्या माध्यमातून जमीन संपादनाची कार्यवाही सुरू आहे.
ठाणे-बोरिवली ट्विन टनेलमुळे प्रवास वेगवान
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून दोन भुयारी मार्ग (ट्विन टनेल) उभारले जात आहेत. या प्रकल्पामुळे ठाणे-बोरिवली प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, शहरातील वाहतूक ताण हलका होणार आहे.
हायस्पीड रेल्वे स्थानकाभोवती ‘मल्टिमोडल’ विकास
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर अंतर्गत ठाणे स्थानक परिसरातील सुमारे २१८ हेक्टर क्षेत्राचा विकास महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे.
यामध्ये मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट इंटिग्रेशन, सागरमाला प्रकल्पांतर्गत नवीन जेट्टी, जलमार्ग वाहतुकीचा पर्याय यांचा समावेश असून, ठाणे हे बहुआयामी वाहतूक केंद्र बनण्याची शक्यता आहे.
घोडबंदर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यावर भर
घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन २० कि.मी. लांबीचे २३ नवीन रस्ते विकसित करण्यात येत आहेत. तसेच, उड्डाणपूल उभारणीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, यामुळे ‘बॉटलनेक’ समस्या दूर होण्याची अपेक्षा आहे.
ऐरोली-कळवा कॉरिडॉर व पुनर्वसन प्रकल्प
मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ७८६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
शैक्षणिक व कौशल्य विकास प्रकल्पांना चालना
खिडकाळी येथे रसायन तंत्रज्ञान संस्था संशोधन केंद्र
हायब्रीड स्कील विद्यापीठ
डिजिटल विद्यापीठ, हेल्थ इन्स्टिट्यूट, अर्बन फॉरेस्ट पार्क
यांसारख्या प्रकल्पांमुळे ठाणे शिक्षण व संशोधन क्षेत्रातही पुढे येण्याची चिन्हे आहेत.