स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांची मुजोरी
लांबच्या भाड्यासाठी प्रवेशद्वारावरच गराडा; प्रवाशांची होतेय कोंडी
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) ः ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढल्याचे दिसून येत आहे. लांबच्या भाड्यासाठी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर घोळक्याने उभे राहून तेथे कोंडी केली जात आहे. यामुळे महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना स्थानकामधून बाहेर पडणे कठीण होते. स्थानकाच्या दोन्ही बाजूंकडे अशीच अवस्था असून, या परिसरात प्रवाशांची कोंडी होताना दिसत आहे.
ठाणे हे मध्य आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. उपनगरी लोकल गाड्यांशिवाय राज्यासह देशभरात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या येथून ये-जा करतात. त्यामुळे येथे सतत प्रवाशांची गर्दी असते. इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांकडून बस, रिक्षा, टॅक्सीला मोठी मागणी असते. याचा गैरफायदा घेत काही रिक्षा, टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची आर्थिल लुबाडणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर गर्दी करून हे रिक्षा, टॅक्सीचालक त्यांच्याकडून मनमानी भाडे वसूल करीत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जाते. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवासी सामानासह स्थानकाबाहेर येताच हे चालक त्यांना गराडा घालून कुठे जायचे असे विचारतात. तसेच ठिकाण सांगताच ३०० पासून १,०००-१,५०० रुपयांपर्यंत भाडे सांगून त्यांना त्यांच्या गाडीतून येण्याचा आग्रह करतात. अनेकदा लांबचा प्रवासी आपल्याच रिक्षात बसावा, यासाठी चालकांमध्ये वाद होण्याचे प्रकारदेखील घडताना दिसून येतात. पोलिस, प्रादेशिक परिवहन, ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाकडून येथे कारवाई होत असते; मात्र कारवाईला न जुमानता रिक्षाचालकांची दादागिरी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना
एकट्या महिला, तरुणीला रिक्षाची गरज नसतानाही हे रिक्षाचालक त्यांच्या मागे जातात. प्रवेशद्वारावर उभे राहणारे अनेक रिक्षाचालक टपोरी वर्तन करताना दिसतात. त्यांच्या घोळक्यातून पुढे जाताना महिला आणि तरुणींना असुरक्षित वाटते.
प्रामाणिक रिक्षाचालकांवर अन्याय
अधिकृत रिक्षा स्टॅन्डवरसुद्धा हे रिक्षाचालक उभे राहून रांगेतून लांबचे भाडे घेऊन जातात. त्यामुळे रांगेतील प्रामाणिक रिक्षाचालकाला मात्र जवळच्या भाड्यावर समाधान मानावे लागते. पश्चिमेकडे स्थानक परिसरातून बाहेर जाण्यासाठी असलेल्या दोन्ही रस्त्यांच्या कडेला रिक्षा उभ्या करून लांबचे प्रवासी शोधून आणत ते रिक्षात भरले जातात. बाहेर पडण्याच्या वाटेतच रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने रोजच मोठी कोंडी होते.
जेवढा त्रास रेल्वे प्रवासादरम्यान होत नाही तेवढा स्थानकाबाहेर येताना समोर उभ्या राहिलेल्या रिक्षाचालकांपासून होतो. त्यांचे घोळके मागे-पुढे फिरून कुठे जायचे, असे विचारत असतात. त्यांच्यातून बाहेर रिक्षा स्टॅन्ड गाठणे कठीण होते.
- संपदा टेंबे, प्रवासी, ठाणे
ठाणे स्थानकावर एक्स्प्रेस मेलमधून उतरलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी रेल्वेच्या दारावर थांबणाऱ्या रिक्षाचालकांवर आमचे पथक कारवाई करीत असते. प्रवाशांच्या तक्रारी आल्यावरदेखील कारवाई केली जाते. स्थानक पूर्व परिसरात आमची सतत गस्त असते.
- दिलीप पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरी वाहतूक
फोटो ओळ
ठाणे ः स्टेशन परिसरात रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा उभ्या करून कोंडी करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.