रेल्वे नोकरीच्या प्रलोभनाने महिलेवर अत्याचार
डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार; पतीकडून १० लाखांची फसवणूक
डोंबिवली, ता. २४ : रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आणि तिच्या पतीकडून १० लाख रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी रहीम पद्मसी ऊर्फ करीम मोहम्मद जैन ऊर्फ करण जोशी याच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
तक्रारीनुसार, २०१४-१५ मध्ये आरोपीची पीडित महिलेशी ओळख झाली होती. रेल्वे किंवा कस्टममध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. मे २०१७ मध्ये ''आई आजारी आहे'' असे खोटे सांगून त्याने महिलेला घरी बोलावले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. या कृत्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याने गेल्या अनेक वर्षांपासून महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
आरोपीने केवळ महिलेचे शोषण केले नाही, तर तिच्या पतीलाही रेल्वेचे कंत्राट मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. या बदल्यात त्याने पतीकडून १० लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने पत्नीला विचारणा केली, तेव्हा पीडितेने स्वतःवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. या धक्क्यातून सावरत दाम्पत्याने पोलिसांत धाव घेतली. पीडित महिलेने या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. आरोपी परिसरातच वावरत असताना पोलिस त्याला फरार का म्हणत आहेत? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. तसेच, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात महिला तपास अधिकारी असणे आवश्यक असताना पुरुष अधिकारी असल्याने माहिती देण्यात अडचणी येत असल्याचे सांगत तिने तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे.
अटकपूर्व जामीन फेटाळला
गुन्हा दाखल होताच आरोपीने अटकेपासून वाचण्यासाठी कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे, अशी माहिती फिर्यादीचे वकील ॲड. महेश शिवदास यांनी दिली. आरोपी सावकारी व्यवसाय करत असून त्याने इतरही अनेक महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.