उलवेतील शगुन चौकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे नामकरण
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोहळा !
उलवे, ता. २४ (बातमीदार) : गेल्या अनेक वर्षांपासून उलवे सेक्टर १९ येथील शगुन चौकाचे नाव बदलून ‘ छत्रपती शिवाजी महाराज चौक ’ करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत होती. अखेर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या मागणीला यश आले असून, मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्थानिक नागरिक, उलवे समिती, प्रशासन तसेच परिवहन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भगव्या पताका, रोषणाई आणि सजावटीने नटला होता. नव्याने उभारण्यात आलेल्या आकर्षक कमानीवर ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असा झगमगता फलक लावण्यात आला होता.
या वेळी शिवप्रेमींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून रॅली काढली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात वातावरण दणाणून गेले होते. महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सोहळ्याची शोभा वाढवली. काही नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात उपस्थित राहून कार्यक्रमाला ऐतिहासिक रंग दिला.
दरम्यान, चौकाचे अधिकृत नामकरण झाल्यानंतर आता हे नाव बस तिकीटांवर व इतर शासकीय नोंदींमध्ये कधीपासून दिसणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.