नवी मुंबई महानगरपालिका चषक ४०+ क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक ४०+ क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. ४० वर्षांवरील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे तसेच शारीरिक तंदुरुस्ती व आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळील क्रीडांगणात सुरू झालेली ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. उद्घाटनप्रसंगी क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीष म्हात्रे यांनी खेळाडूंच्या उत्साहाचे कौतुक केले. या प्रसंगी उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच ४०+ क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत ग्रामीण भागातील ३३ आणि शहरी भागातील २५ अशा एकूण ५८ संघांचा सहभाग आहे. उद्घाटनाच्या सामन्यात पावणेगाव संघाने ऐरोलीगाव संघावर विजय मिळवला. ग्रामीण व शहरी अशा दोन गटांमध्ये विजेते आणि उपविजेते संघांना चषक देण्यात येणार असून, उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेऱ्या राजीव गांधी क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक प्रकाशयोजनेत पार पडणार आहेत.