पाटबंधारे विभागाला ठोकले पालिकेने टाळे
कर थकबाकीमुळे ठाणे पालिकेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे पालिकेच्या आर्थिक स्थितीत आजही फारशी सुधारणा झालेली नाही. त्यातच मालमत्ता कर विभागाला मागील आर्थिक वर्षात देण्यात आलेले कर वसुलीचे उद्दिष्टांपैकी अपेक्षित वसुली झालेली नसल्यामुळे पालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मालमत्ता कर विभागाने वसुलीचे हत्यार अधिक तीव्र केले असून थकबाकीदारांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यानुसार कळवा येथील लघु पाटबंधारे विभागाने ५३ लाखांचा मालमत्ता कर थकविल्याने पालिकेने कार्यालयाला टाळे ठोकले आहे.
ठाणे पालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा भाग म्हणून मालमत्ता विभागाकडे पहिले जाते. मालमत्ता विभाग मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कर वसुलीत पिछाडीवर गेला आहे. मागील अर्थसंकल्पात पालिकेने या विभागाला ९२० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. डिसेंबर महिनाअखेर ५३६ कोटी ३५ लाखांची कर वसुली संबंधित विभागाने केल्याचे समोर आले. यावरून आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त करून थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. यामध्ये कर थकबाकी असलेल्या खासगी मालमत्तांवर कारवाई करण्यात येत होती. असे असले तरी, शहरातील शासकीय कार्यालयांकडून थकीत कर वसुलीसाठी फारशी पाऊले उचलण्यात येत नव्हती. यामुळे मालमत्ता कर विभागाकडून अपेक्षित कर वसुली न झाल्याने टीका होऊ लागली.
दरम्यान, पालिकेच्या मालमत्ता विभागावर टीका होताच हा विभाग पुन्हा कर वसुलीसाठी आक्रमक झाल्याचे दिसून येते. कळवा येथे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यालय असून येथील संबंधित विभागाच्या अभियंतांची कार्यालयांना टाळे लावले आहे. या विभागातील जलसंपदा, मृदू व सर्वेक्षण, घाटघर जल विद्युत विभाग, पाटबंधारे, जल गुणवंता प्रयोगशाळा, जलसंधारण अशा सर्व विभागांचे मिळून तब्बल ५३ लाख रुपयांचे कर थकबाकी असल्याने ही कारवाई महापालिकेने केली असल्याची माहिती कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव यांनी दिली.