मुंबईत रंगणार ‘अनहद’ सोहळा
दोन दिवस शास्त्रीय संगीताची मेजवानी
मुंबई, ता. २४ : भारतीय शास्त्रीय संगीताच्या अनंत आणि आध्यात्मिक परंपरेचा अनुभव देणारा ‘अनहद’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे २७ आणि २८ मार्चला ‘एनसीपीए’ नरिमन पॉइंट येथे सायंकाळी ६ वाजता येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम स्पीक मॅके (सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिक्ल म्युझिक ॲण्ड कल्चर एमगस्ट युथ) यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे, तसेच एसबीआय पेमेंट प्रमुख प्रायोजक म्हणून लाभले आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा उपस्थित राहणार आहेत.
स्पीक मॅके ही संस्था गेल्या ४० दशकांपासून भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, हस्तकला आणि पारंपरिक कलांच्या माध्यमातून तरुण पिढीला भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचे कार्य करत आहे, अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कलावंतांसोबत संवाद साधता येतो. युवकांना प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून उच्च दर्जेदार कलेचा अनुभव मिळावा आणि भारतीय परंपरेचे सौंदर्य व तत्त्वज्ञान समजावे, हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. ‘अनहद’ या संकल्पनेअंतर्गत पुणे आणि मुंबई दोन्हीही शहरात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. नामवंत कलाकारांच्या सादरीकरणातून रागसंगीताच्या विविध छटा, तालांची सूक्ष्मता आणि स्वरांचे सौंदर्य, तात्त्विक, आध्यात्मिक आणि सौंदर्यपूर्ण बाजू रसिकांना अनुभवता येणार आहे. भारतीय शास्त्रीय कलेच्या संवर्धनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या दोनदिवसीय कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीतातील चार दिग्गज कलाकार आपल्या कलेची प्रस्तुती करणार आहेत. यामध्ये २७ मार्चला उस्ताद बहाउद्दीन डागर (रुद्र वीणा), पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर (शास्त्रीय गायन) तर २८ मार्चला पद्मभूषण बेगम परवीन सुलताना (शास्त्रीय गायन) तसेच पद्मविभूषण डॉ. एन. राजम (शास्त्रीय वायलीन) हे आपली कला सादर करणार आहेत. या कलावंतांना ज्ञानेश्वर देशमुख (पखवाज), पद्मश्री सुरेश तळवलकर (तबला), अनंत जोशी (संवादिनी), श्रीनिवास आचार्य (संवादिनी), पंडित मुकुंदराज देव (तबला), रागिनी शंकर (व्हायोलिन) आणि अजित पाठक (तबला) हे साथ देणार आहेत.
पुण्यातही कार्यक्रम
पुणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम एरंडवणे या ठिकाणी २७, २८ मार्चला दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कर्नाटक व्हायोलिनवादक एन कन्याकुमारी, शास्त्रीय गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार, कर्नाटक गायक अभिषेक रघुराम, बासरीवादक पद्मश्री पंडित रोणू मजुमदार हे आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला संगीतकार म्हणून के. शेखर, अनिरुद्ध अत्रेय, शिवतेजा जोयसुला, सुयोग कुंडलकर, भरत कामत, सुमेश नारायण, अलकोडे व्ही. एस. गोकुल, पंडित रामदास पळसुलेसारखे प्रतिभावान कलावंत लाभलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.