हार्दिक पाटील आयर्नमन स्पर्धेचा विजेता
नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : क्रीडाविश्वातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत विरारचे सुपुत्र हार्दिक पाटील यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. न्यूझीलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवून ४३वी पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा जिंकण्याचा मान मिळविला आहे.
भारताचे नामांकित ट्रायथलीट कौस्तुभ राडकर यांच्यानंतर आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे हार्दिक पाटील हे दुसरे भारतीय खेळाडू ठरले आहेत. आयर्नमॅन स्पर्धेत ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी धावण्याचा समावेश असतो. अशा अत्यंत आव्हानात्मक वातावरण आणि भौगोलिक परिस्थितीत न्यूझीलंड येथील स्पर्धा पूर्ण करून त्यांनी आपली जिद्द सिद्ध केली आहे. या वर्षात आणखी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जागतिक पातळीवर प्रथम स्थानावर नेण्याचा त्यांचा संकल्प आहे. केवळ स्पर्धा पूर्ण करणेच नव्हे, तर आयर्नमॅनच्या माध्यमातून जागतिक पटलावर भारताचे नेतृत्व करण्याचा त्यांचा मानस आहे. हार्दिक यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या या यशाने केवळ विरारच नव्हे तर संपूर्ण भारताची मान जागतिक क्रीडा क्षेत्रात उंचावली आहे.
--------
अनेक तासांचा सराव
वयाच्या ११व्या वर्षापासून हार्दिक यांना क्रीडा क्षेत्रात आवड निर्माण झाली. वसई कला-क्रीडामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांत त्यांनी भाग घेऊन अनेक पारितोषिक मिळविली आहेत. पुण्यातील आयर्नमॅन डॉ. कौस्तुभ राडकर यांच्या प्रेरणेतून हार्दिकने आयर्नमॅन होण्याचा निश्चय केला. तेव्हापासून ते दिवसाला सहा ते सात तास कसून सराव करीत स्पर्धेची तयार करीत होते. २०१५मध्ये न्यूझीलँड येथे झालेल्या पहिल्या आयर्नमॅन स्पर्धेचा किताबही हार्दिक यांनी पटकावला आणि त्यांची घोडदौड सुरू झाली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे फिरून पाहिले नाही. २०१५ ते आजपर्यंत त्यांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मॅक्सिको, न्यूझीलंड, स्वीडन, तैवान, इस्टोनिया, ऑस्ट्रिया या देशांत पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.