भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : शेकडो वर्षांपासून जुन्या भिवंडीला पाणीपुरवठा करणाऱ्या वऱ्हाळा तलावातील पाणी काही वर्षांपासून प्रदूषित झाले आहे. त्यामुळे १० मार्चपासून या तलावातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून काही भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
भिवंडी महापालिकेकडून शहरासाठी स्टेम प्राधिकरणाकडून ७३ एमएलटी, तर मुंबई महापालिकेकडून ४२ एमएलटी पाणी खरेदी केले जाते. याशिवाय वऱ्हाळा तलावातून सुमारे पाच एमएलटी पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरवासीयांना पुरवले जात होते. मात्र, फेणे परिसरातील सांडपाणी तलावात जात असल्याने पाणी दूषित झाले होते. परिणामी, पाण्याचा रंग बदलून हिरवा होणे, तसेच जलपर्णीचे प्रमाण वाढणे अशा समस्या वारंवार निर्माण होत होत्या पालिकेकडून या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करून शुद्धीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातही विविध प्रक्रिया करण्यात आल्या; मात्र सांडपाणी रोखण्यासाठी आवश्यक ठोस उपाययोजना न झाल्याने परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. परिणामी, हिरव्या पाण्याचा रंग बदलला नाही.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भिवंडी महापालिका यांच्या संयुक्त सहभागातून वऱ्हाळा तलाव स्वच्छता व सुशोभीकरण प्रकल्प होणार आहे. मात्र, तीन वर्षांपासून निधीअभावी तो लाल फितीमध्ये अडकला आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता अधिक खालावली आहे. तर दुसरीकडे तलावाच्या पाण्यावर प्रक्रिया करूनही शहरवासीयांना मिळणारे पाणी शुद्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या. यासाठी प्रक्रियायुक्त पाण्याची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे बेंचमार्फत तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने १० मार्चपासून तलावातील पाणीपुरवठा महापालिकेकडून पूर्णतः बंद करण्यात आला. सध्या मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा नागरिकांना पुरवठा केला जात आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
वऱ्हाळा तलावातील पाणी प्रामुख्याने जुन्या भिवंडीतील नागरिकांना पुरवले जाते. शेकडो वर्षांपूर्वी वऱ्हाळा तलावाचे पाणी नागरिकांनी नळीच्या कौलांद्वारे हौदांमध्ये आणले होते. तेव्हापासून या तलावाचे पाणी शहरवासीयांना मिळत होते. त्यानंतर भिवंडी निजामपूर नगर परिषद झाल्यानंतर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून जलवाहिनीद्वारे भिवंडीकरांना पाणी पुरवण्यात येऊ लागले. त्यामध्ये भिवंडी व निजामपूर या दोन्ही लोकवस्तीचा समावेश होता. या जुन्या जलवाहिनीतून आजतागायत पाणीपुरवठा होत होता. आता वऱ्हाळा तलावातील पाच एमएलटी पाणी पुरवणे बंद केल्याने शहरातील काही भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
-----
सध्या वऱ्हाळा तलावातील पाच एमएलटी पाणी बंद झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या ४२ एमएलटी पाण्यातूनच पुरवठा केला जात आहे. त्यापैकी २७ एमएलटी पाणी जलशुद्धीकरणानंतर जुन्या भिवंडीचा परिसर आणि इतर भागात वितरित केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी पाणी पोहोचत नसल्याने तेथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा पालिकेचे तीन आणि खासगी तीन टँकरद्वारे केला जात आहे.
- संदीप पटनावर, कार्यकारी अभियंता
पाणीपुरवठा विभाग, भिवंडी महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.