डोंबिवलीत भोंदूबाबाकडून फसवणूक
डोंबिवली, ता. २४ : डोंबिवलीत अंधश्रद्धेचा फायदा घेत भोंदूबाबाने वयोवृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नातील दोष दूर करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करून आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दीपक विठ्ठल सावंत ऊर्फ दीपक देसाई (६२) असे आरोपीचे नाव असून, तक्रारदार सुलचंद (६६) यांनी मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्याने मंगळवारी (ता. १७) सावंत याला धार्मिक विधीसाठी बोलावले होते. ‘दोष’ दूर करण्याच्या नावाखाली त्याने सुरुवातीला दोन हजार रुपये घेतले. त्यानंतर पूजेसाठी सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची नाणी मागवून विधीदरम्यान कुटुंबीयांना गुंतवून ठेवत दागिने चोरून पसार झाला. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि सीडीआरच्या मदतीने आरोपीला आंबिवलीतून अटक केली. पुढील तपास सुरू आहे.