बालचित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
मुंबई, ता. २४ : महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे १ मार्च २०२६ला सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, ६५ विद्यार्थी विजेते ठरले आहेत.
महापालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये ८६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल मंगळवारी (ता. २४) महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात महापौर रितू तावडे यांनी घोषित केला. या वेळी उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तिवर्धन किरीतकुडवे, कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार आदी उपस्थित होते. एकूण पाच गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस, पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी २० हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास १५ हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रत्येकी १० विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.
विभाग स्तरावर पारितोषिके
विभाग स्तरावर प्रत्येक गटात पाच याप्रमाणे २५ अशा एकूण २५ प्रशासकीय विभागांमध्ये ६२५ उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपयांचे रोख पारितोषिके आणि पदकेदेखील देण्यात येणार आहेत. पारितोषिक विजेत्यांना लवकरच समारंभपूर्वक पारितोषिक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.