‘टीबीमुक्त कल्याण-डोंबिवली’साठी महापालिका सज्ज
१०० दिवसांच्या विशेष मोहिमेला सुरुवात
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : शहरातून क्षयरोगाचे (टीबी) समूळ उच्चाटन करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंबर कसली आहे. ‘जागतिक क्षयरोग दिना’चे औचित्य साधून पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘टीबीमुक्त भारत अभियान २.०’अंतर्गत १०० दिवसांच्या विशेष मोहिमेला दिमाखात सुरुवात करण्यात आली. रुक्मिणीबाई रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ‘निःक्षय मित्रां’चा गौरव आणि रुग्णांना पोषण आहार वाटप करण्यात आले.
पुढील १०० दिवस महापालिका क्षेत्रात आक्रमकपणे क्षयरोग निर्मूलनाचे काम केले जाणार आहे. यात संशयास्पद रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. कफ तपासणी आणि एक्स-रे सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये आणि झोपडपट्टी भागात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. निदान झालेल्या रुग्णांवर विनाविलंब औषधोपचार सुरू करणे, हा मोहिमेचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलक्षणा त्रिभुवन, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा ढाके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक सहभाग आणि ‘निःक्षय मित्र’
क्षयरोग निर्मूलनासाठी केवळ सरकारी यंत्रणा पुरेशी नसून सामाजिक सहभागाची गरज आहे. याच हेतूने ‘निःक्षय मित्र’ संकल्पना राबविली जात आहे. या वेळी इनरव्हील क्लब, रोटरी क्लब आणि आयएमए कल्याण यांच्या सहकार्याने २१० रुग्णांना पोषण आहार किट देण्यात आले. क्षयरोग हा संसर्गजन्य असला तरी तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. लक्षणे दिसताच तपासणी करावी; मात्र उपचार अर्धवट सोडू नका; अन्यथा तो अधिक घातक (औषध प्रतिकारक) होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा इटकर यांनी दिली.
क्षयरोगाची प्रमुख लक्षणे
१. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे
२. सतत येणारा ताप आणि रात्रीचा घाम
३. वजनात अचानक घट होणे आणि भूक न लागणे