सूर्यफुलामुळे समृद्धीकडे वाटचाल
विक्रमगडमधील शेतकऱ्यांचा दुबार पिकांकडे कल
विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) ः वाढत्या महागाईमुळे खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा काळात विक्रमगड तालुक्यात सूर्यफुल लागवडीकडे शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला आहे. त्यामुळे पारंपरिक भातशेतीबरोबर दुबार पिकांमधून समुद्धीकडे वाटचाल सुरू आहे.
तालुक्यात पावसाळी हंगामात भातपिक घेतले जाते. उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवर्षी ३६० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला घेतला जातो; मात्र काही प्रगतशील शेतकरी खाद्यतेल देणाऱ्या पिकांच्या लागवडीकडे वळत असून सूर्यफूल पीक सर्वोत्तम ठरत आहे. तालुक्यात अंदाजे २५ ते ३० हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूल लागवड करण्यात आली आहे. अल्प खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक असल्याने सूर्यफुलाची शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. या पिकासाठी मजुरांची गरज कमी भासते तसेच देखभाल खर्चही मर्यादित असल्याने उत्पादनही भरघोस येत आहे.
------------------------------
जनावरांच्या खाद्यासाठी वापर
पालघर जिल्ह्यातील हवामान, जमीन सूर्यफूल पिकासाठी पोषक असल्याने माण, ओंदे, ब्राम्हणगाव, आलोंडे, वाकडूपाडा, दादडे तसेच इतर गावांतील शेतकऱ्यांनी कुटुंबीयांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात सूर्यफूल लागवड केली आहे. सूर्यफूल पीक लागवडीनंतर अवघ्या तीन ते साडेतीन महिन्यांत तयार होते. फुलांची काढणी करून बिया वेगळ्या केल्या जातात. तेल काढल्यानंतर उरलेला चोथा सेंद्रिय खत तसेच जनावरांच्या खाद्यासाठी उपयोगी पडतो.
----------------------------
खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सूर्यफुल लागवडीमुळे घरी शुद्ध खाद्यतेल उपलब्ध होत आहे. माण गावासह परिसरातील गावांमध्येही शेतकरी सूर्यफूल लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.
- प्रतीक पाटील, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.