६५ बेकायदा इमारतींवरून कलगीतुरा
कल्याण-डोंबिवलीत भाजपचा शिवसेना आमदारांना टोला
डोंबिवली, ता. २५ : कल्याण-डोंबिवलीतील गाजलेल्या ६५ बेकायदा इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात ओढला गेला आहे. या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष उफाळून आला असून, दोन्ही पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत शिवसेना आमदार राजेश मोरे यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर बाधित नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला; मात्र या दाव्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी नाव न घेता आमदार मोरे यांच्यावर निशाणा साधला. केवळ बैठकांचे फोटो काढून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका म्हात्रे यांनी केली. नुसत्या चर्चा नकोत तर उल्हासनगरच्या धर्तीवर तातडीने शासन निर्णय काढून रहिवाशांना अभय द्या, अशी आग्रही मागणी भाजपने केली आहे. पालिकेच्या नोटिसांमुळे हजारो कुटुंबांचे भवितव्य टांगणीला लागले असून, ठोस निर्णयाअभावी रहिवासी चिंतेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय पेच
एकीकडे शिवसेना दिलासा मिळाल्याचा दावा करित असताना दुसरीकडे अधिकृत शासन निर्णय नसल्याने विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे. या राजकीय कलगीतुऱ्यात सामान्य नागरिक मात्र कारवाईच्या छायेत आहे. ६५ बेकायदा इमारतींचा हा तिढा आता केवळ प्रशासकीय राहिला नसून, त्याला पूर्णपणे राजकीय रंग चढला आहे. आता शासन नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
आम्ही सुरुवातीपासून नागरिकांच्या पाठीशी आहोत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या जाणाऱ्या घोषणांनी प्रश्न सुटणार नाही.
- दीपेश म्हात्रे, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.