वाशी, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये क्रांतिकारी बदल करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी सोमवारी (ता. २३) सर्वसाधारण सभेत शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारा ‘नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतरण धोरण २०२६’ हा प्रस्ताव मांडला आहे. या धोरणाच्या माध्यमातून पालिकेच्या शाळांना टप्प्याटप्प्याने इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याचा निर्णय पुढे आला आहे; मात्र या प्रस्तावावर सदस्यांना बोलायचे आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी महासभा तहकूब करण्यात आली असून, पुढील महासभेत मंजुरीसाठी प्रस्ताव पटलावर येणार आहे.
आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि संवाद या सर्व क्षेत्रांमध्ये इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी इंग्रजी माध्यमाची गरज असल्याचे नाईक यांनी निवेदनात स्पष्ट केले. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी समाजातील विविध घटकांमधून येत असल्याने त्यांनाही आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळावी, हा या धोरणामागील प्रमुख उद्देश आहे.
या धोरणानुसार महापालिकेच्या शाळांमध्ये केजी (बालवाडी) स्तरापासून इंग्रजी माध्यम सुरू करण्यात येणार आहे. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम लागू केले जाणार असून, सध्या इतर माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे माध्यम बदलले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. येत्या काळात या प्रस्तावावर होणाऱ्या चर्चेकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
मराठीचे महत्त्व अबाधित
मराठी भाषा विषय म्हणून कायम ठेवण्यात येणार असल्यामुळे मातृभाषेचे महत्त्व अबाधित राहणार आहे. यासोबतच शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात आला आहे.
शिक्षण व्यवस्थेला नवे वळण
कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य आणि नागरी जबाबदारी यांचा समावेश शिक्षण व्यवस्थेत करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न या धोरणातून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव शहराच्या शिक्षण व्यवस्थेला नवे वळण देणारा ठरण्याची शक्यता आहे.
सीबीएससी शाळा न करता एसएससी बोर्डाच्या महापालिका शाळांमध्येच इंग्रजी शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून बालवाडीत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत. शाळांमधील मराठी माध्यमाचा पर्यायही कायम राहील. मराठी भाषेला बाधा पोहोचणार नाही. उलट तिचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत स्थानिक भाषेचे संवर्धन करणे हीच आमची भूमिका आहे.
- सागर नाईक, सभागृह नेते, नवी मुंबई महापालिका
महापालिकेच्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानेच इंग्रजी माध्यम राबविण्यात येणार आहे. यावर्षी नर्सरीचे वर्ग सुरू होतील आणि पुढील १० ते १३ वर्षांत सर्व शाळा इंग्रजीच्या करण्याचे नियोजन आहे. या प्रक्रियेत शिक्षकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीशी जोडणे, यावर विशेष भर दिला जाईल. मात्र मराठी विषय अनिवार्य राहणार आहे आणि विद्यार्थ्यांना मातृभाषेचे ज्ञान तसेच संस्कार मिळत राहतील, याची काळजी घेतली जाईल.
- सुजाता पाटील, महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.