महाकाय केबल स्टे ब्रिज पूर्ण
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूरक कामांना वेग
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्चून उभारल्या जात असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा अंतिम टप्पा असलेला उंबरखिंड येथील महाकाय दरीवरील ६५० मीटर लांबीचा केबल स्टे ब्रिज अखेर पूर्ण झाला आहे. जमिनीपासून सुमारे १३२ मीटर उंचीवर असलेल्या या पुलाची जोडणी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने पूर्ण केली आहे. आता फिनिशिंग, लेन मार्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत दिवे, टेलिफोन, रिफ्लेक्टरच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिसिंग लिंक सेवेत दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्याने खंडाळा घाटात नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर पावसाळ्यात याठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) खंडाळा घाटात १३.३ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक रोड बनवला जात आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाची वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. या मार्गावर बोगदे आणि केबल स्टे ब्रिज असणार आहेत. त्यापैकी बोगद्याचे काम याआधीच पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या पॅकेज दोनमधील ६५० मीटर लांबीचा केबल स्टे ब्रिज देशातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज ठरणार आहे. त्यासाठी तब्बल १८२ मीटर उंचीचे स्तंभ (पायलॉन) उभारून त्या आधारे केबल स्टे ब्रिजला आकार देणे मोठे आव्हानात्मक काम होते. त्यातच या दरीतून तशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने आणि धुवाधार पावसामुळे काम करताना मर्यादा येतात. त्याही परिस्थितीत अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने तब्बल २४० केबलच्या साहाय्याने हा ब्रिज हवेत तयार केला. त्यामुळे या पुलाची पूरक कामे पूर्ण करून मेपर्यंत हा नवा मार्ग सेवेत येणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.
जोरदार वाऱ्यामुळे आवाहन
‘एमएसआरडीसी’ने ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून उभारल्या या केबल स्टे ब्रिजचे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होते. अरुंद कडे, तीव्र उतार, दाट धुके आणि ताशी १०० किमी वेगाने वाहणारे वारे अशा परिस्थितीतही काम सुरू आहे. अनेकदा मंद गतीने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग अचानक वाढतो तेव्हा स्तंभावर (पायलॉन) काम करणे दूरच; पण उभा राहणेही कठीण होते, असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.