‘ही शाळा अनधिकृत’
तळोजा वसाहतीतील शाळांसमोर प्रशासनाचे फलक
खारघर, ता. २५ (बातमीदार) : तळोजा वसाहतीत कार्यरत असलेल्या काही शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट होताच पनवेल पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने कडक पावले उचलली आहेत. संबंधित शाळांच्या प्रवेशद्वारांवर ‘ही शाळा अनधिकृत असून येथे प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी प्रशासनाची राहणार नाही’, असे थेट फलक लावण्यात आले आहेत.
तळोजा फेज १ व २ परिसरातील बजाज इंटरनॅशनल स्कूल, वेस्ट हिल स्कूल, अर्कम स्कूल, ओशियन ब्राईट स्कूल आणि कलसेकर स्कूल या शाळांबाबत काही जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने संबंधित शाळांची पाहणी केली. पाहणीदरम्यान या शाळांनी शासनाची आवश्यक परवानगी न घेता शिक्षण सुरू केल्याचे आढळून आले. गट शिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांच्या सूचनेनुसार केंद्र प्रमुखांनी बुधवारी (ता. २५) या सर्व शाळांसमोर अनधिकृततेचे फलक लावले. तसेच, पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, तळोजा वसाहतीत वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची कमतरतेमुळे अनेक पालक पर्याय नसल्याने अशा शाळांकडे वळत आहेत. फ्लॅट, रो-हाऊस किंवा व्यावसायिक गाळ्यांमध्ये भाड्याने जागा घेऊन काही संस्थांनी शाळा सुरू केल्याचेही समोर आले आहे.
तळोजामध्ये काही अनधिकृत शाळा सुरु असल्याचे निदर्शनास येताच शाळा अनधिकृत असल्याचे फलक लावण्यात आले आहे. पालकांनी अनधिकृत शाळेत पाल्यांचा प्रवेश घेवू नये.
- शाहू सतपाल, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.