नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची सेवाभावाची शपथ
दीपप्रज्वलनातून मानवतेचा संदेश
वाशी, ता. २५ (बातमीदार) : नर्सिंग हा व्यवसाय निःस्वार्थ सेवेचे प्रतीक मानला जातो. या मूल्याची जपणूक करीत नवी मुंबईतील आदित्य हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि व्यावसायिक नीतिमत्तेची शपथ घेतली. कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये रविवारी (ता. २२) हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मेणबत्त्यांच्या ज्योती एकमेकांना देत सेवा आणि समर्पणाची परंपरा जपण्याचा संदेश दिला. ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयाचे अधिसेवक प्रकाश बारवे आणि सायन रुग्णालयाच्या अधिसेविका अनिता हांडे यांच्या उपस्थितीत शपथविधी झाला. तसेच जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या माध्यमातून शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार नर्सिंग शिक्षणाची संधी उपलब्ध होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच या संस्थेतून घडणाऱ्या परिचारिका नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थापक डॉ. प्रतीक तांबे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या वेळी नगरसेविका वैष्णवी वैभव नाईक, सायली शिंदे, नगरसेवक शिरीष पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.