डोंबिवलीत खोदकामामुळे बत्ती गुल!
जेसीबीच्या धक्क्याने वीजवाहिनी तुटली; सहा तास वीजपुरवठा खंडित
डोंबिवली, ता. २६ : डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा आणि गोपीनाथ चौक परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान जेसीबीच्या खोदकामात महावितरणची मुख्य भूमिगत वीजवाहिनी तुटल्याची घटना बुधवारी घडली. या तांत्रिक बिघाडामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सलग सहा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. रणरणत्या उन्हात वीज नसल्याने स्थानिक नागरिक, रुग्णालय आणि लघुउद्योजकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळेच ही वेळ आल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली होती.
रस्त्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात जेसीबीच्या फावड्यामुळे महावितरणची हाय-टेन्शन केबल कापली गेली. यामुळे देवीचा पाडा, जगदांबा माता परिसर आणि महाराष्ट्रनगरच्या काही भागात पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला होता. भरदुपारी पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल झाले. विजेवर अवलंबून असलेले लघुउद्योग ठप्प झाले, तर दवाखाने आणि रुग्णालयांच्या कामकाजावरही याचा परिणाम झाला. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात इंटरनेट आणि लॅपटॉप चार्जिंगअभावी व्यत्यय आला.
दुरुस्तीत तांत्रिक अडथळे
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र दुरुस्तीदरम्यान मुख्य वाहिनीचे कंडक्टर दोन वेळा निकामी झाल्याने कामाला अपेक्षित वेळेपेक्षा जास्त विलंब झाला. नवीन केबल टाकून अखेर सायंकाळी ६ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.
अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह
शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना महापालिका किंवा कंत्राटदाराचे पर्यवेक्षक घटनास्थळी नसतात, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. भूमिगत जलवाहिन्या किंवा वीजवाहिन्यांची कोणतीही माहिती न घेता अंदाजे खोदकाम केल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.