ग्रामीण आरोग्य यंत्रणेला निधीची कात्री
मागील वर्षीच्या तुलनेत एक कोटींची घट
ठाणे, ता. २६ ः जिल्हा परिषदेचा २०२६-२७चा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला असून, यामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेसाठीच्या निधीत मोठी कपात करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्य विभागाच्या तरतुदीत सुमारे एक कोटी रुपयांची घट झाल्याने, ‘गाव तिथे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा’ देण्याचा प्रशासनाचा दावा कसा पूर्ण होणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रणजित यादव यांनी बुधवारी हा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी (२०२५-२६) आरोग्य विभागासाठी चार कोटी ८१ लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती; मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात ही तरतूद घटवून तीन कोटी ७८ लाखांवर आणण्यात आली आहे. एकीकडे ग्रामीण भागातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १९० उपकेंद्रांचे सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट असताना, निधीत केलेली ही कपात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणावर परिणाम करण्याची शक्यता आहे. निधीत कपात झाली असली तरी, प्रशासनाने ‘गाव तेथे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा’ या संकल्पनेवर भर दिला आहे. जिल्ह्यातील २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आतापर्यंत ‘स्मार्ट’ करण्यात आली असून, उर्वरित केंद्रे या वर्षी स्मार्ट करण्याचे उद्दिष्ट आहे.
एनक्यूएएस मानांकन
आरोग्य सेवेच्या गुणवत्तेमुळे चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व एका उपकेंद्राला राष्ट्रीय स्तरावरील ‘एनक्यूएएस’ मानांकन प्राप्त झाले आहे. तीन पोर्टेबल एक्स-रे मशीन्स खरेदी करण्यात आल्या असून, आगामी वर्षात आणखी तीन मशीन्स घेण्याचे नियोजन आहे, तसेच ग्रामीण भागातील गरोदर मातांच्या सोनोग्राफीसाठी ६०० रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.
बांधकाम विभागाच्या निधीत मात्र वाढ
आरोग्य विभागाच्या निधीत कपात झाली असतानाच, दळणवळण आणि बांधकाम विभागाच्या पदरात मात्र भरभरून दान पडले आहे. रस्ते दुरुस्ती, मजबुतीकरण आणि पुलांच्या कामांसाठी यंदा १९ कोटी ८७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही तरतूद १७ कोटी ४७ लाख होती. म्हणजेच बांधकाम विभागाच्या निधीत दोन कोटी ४० लाखांची वाढ करण्यात आली आहे.
ग्रामीण जनतेचा सवाल
आरोग्य केंद्रांना आवश्यक वैद्यकीय साहित्य, औषधे आणि लसीकरणासाठी तीन कोटी ७८ लाख रुपये पुरेसे पडणार का? साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद नेमकी कशी पावले उचलणार, असे सवाल आता ग्रामीण भागातून विचारले जात आहेत. रस्ते आणि इमारतींच्या देखभालीला महत्त्व देताना प्रत्यक्ष मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.