उल्हासनगरचे रस्ते घेणार मोकळा श्वास
पी-१, पी-२ फलकांनी शहराचा चेहरा बदलणार; खासगी कंत्राटदारावर जबाबदारी
दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २६ : शहरातील गुदमरणाऱ्या वाहतूक कोंडीला अखेर शिस्तीचा डोस मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनियंत्रित पार्किंग आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे त्रस्त असलेल्या उल्हासनगरकरांसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार आता शहरातील मुख्य बाजारपेठा आणि वर्दळीच्या रस्त्यांवर पी-१ आणि पी-२चे फलक झळकू लागले असून, यामुळे पार्किंगला शिस्त लागण्यासोबतच वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे दिसत आहेत.
वाहतूक नियोजनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. शहर अभियंता हनुमंत खरात, कार्यकारी अभियंता नीलेश शिरसाठे आणि उपअभियंता संदीप जाधव यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ‘झा अँड पी’ कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील भोगले हे पी-१, पी-२चे बोर्ड लावण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करत आहेत. रेल्वे स्थानक परिसर, गोल मैदान आणि मध्यवर्ती बाजारपेठेत हे फलक प्रामुख्याने लावण्यात येत आहेत.
नेमकी काय आहे योजना?
पी-१ आणि पी-२ या संकल्पनेनुसार, तारखेनुसार (सम-विषम) रस्त्याच्या ठरावीक बाजूलाच पार्किंगला परवानगी असेल. यामुळे रस्त्याचा मोठा भाग वाहतुकीसाठी मोकळा राहील. विशेष म्हणजे, या फलकांची निगा राखणे, त्यांची अचूक मांडणी करणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे, याची संपूर्ण जबाबदारी पालिकेने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे.
नियम मोडला तर कारवाईचा बडगा
केवळ बोर्ड लावून पालिका थांबणार नाही, तर वाहतूक पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत. फलक असूनही चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या दिवशी वाहन उभे केल्यास संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रसंगी वाहन ‘टोईंग’ करून उचलले जाणार आहे. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
व्यापाऱ्यांकडून स्वागत
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, रस्ते मोकळे झाल्यास ग्राहकसंख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अचूक चिन्हांकन
केवळ कारवाई न करता, सुरुवातीचे काही दिवस नागरिकांना या नवीन नियमांची माहिती देण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पट्टे ओढून पार्किंगची जागा निश्चित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.