ठाण्यात पुन्हा गोळीबार
२० दिवसांतील दुसरी घटना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : मुंब्रा येथील गोळीबाराची घटना ताजी असतानाच ठाण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २७) घडली आहे. जुन्या वैमनस्यातून वातानुकूलित यंत्रणा दुरुस्तीचे काम करणाऱ्या इंजमाम अमिरुद्दीन सिद्दीकी (२६) या तरुणावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत इंजमाम थोडक्यात बचावले असून, आरोपी जबीउल्ला शफीकुर्रहमान खान (३८) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांची दोन पथके त्याच्या शोधाकरिता रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेटमधील हाजुरी दर्गा परिसरात राहणारे इंजमाम सिद्दीकी हे शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री मैत्रीण आणि तिच्या भावासोबत दुचाकीवरून नाशिक-मुंबई महामार्गावरील धर्मवीरनगर, नौपाडा येथील शेल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. याच दरम्यान आरोपी जबीउल्ला खान याने त्यांना अडवले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी वडिलांबाबत अपशब्द वापरल्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. त्याचाच राग मनात धरून आरोपीने बनावट बंदुकीच्या सहाय्याने दोन राउंड फायर केले. या वेळी इंजमाम थोडक्यात बचावला.
आरोपीने फिर्यादीच्या मैत्रिणीलाही बंदुकीचा धाक दाखवत त्यांची दुचाकी घेऊन तेथून पलायन केले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.