उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित करा!
महापौर रितू तावडे यांचे बेस्ट प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः ‘‘बेस्टला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी स्वमालकीच्या बसचा ताफा वाढविणे, ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीनेही सकारात्मक पावले उचलावीत. बेस्ट प्रशासनाने आर्थिक शिस्त, उत्पन्नवाढ आणि कार्यक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे. प्रभावी व दीर्घकालीन उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी,’’ असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले.
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची संयुक्त सभा महापालिका मुख्यालयात स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी झाली. बेस्ट उपक्रमातील कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या, ग्रॅच्युइटी, वेतन करार, पदोन्नती, अनुकंपा तत्त्वावरील भरती, स्वमालकीच्या बसची उपलब्धता, अर्थसहायता या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन व बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत महापौर तावडे यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच समस्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वस्त केले. ‘बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. सेवानिवृत्त कामगार व कर्मचाऱ्यांचे उपदान आणि इतर कायदेशीर देणी प्रदान करण्याबाबत संवेदनशील आहोत. ‘बेस्ट’कडे स्वतःच्या मालकीच्या बस असाव्यात, यासाठी प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भात सातत्याने बैठका घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही केली जाईल. बेस्ट प्रशासनानेदेखील प्रभावी उपाययोजना आखाव्यात,’ असे प्रतिपादन महापौर रितू तावडे यांनी केले.
...
हे मान्यवर उपस्थित
उपमहापौर संजय घाडी, सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) तथा बेस्ट महाव्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. अश्विनी जोशी, सहाय्यक महाव्यवस्थापक (विधी) राजेंद्र डुबल, मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) रमेश मडावी आदी या वेळी उपस्थित होते.