शहाडच्या बिर्ला मंदिरात ‘रामचरितमानस’ प्रवचन सोहळा
चैत्र नवरात्रोत्सवात भाविक भक्तिरसात न्हाले
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्याचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाड येथील प्रसिद्ध बिर्ला मंदिर परिसरात चैत्री नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेली सातदिवसीय ‘श्रीरामचरितमानस’ प्रवचन सेवा अत्यंत उत्साहात झाली. ऋषिकेश येथील स्वामी श्री मैथिलीशरणजी यांच्या रसाळ वाणीतून वाहणाऱ्या ज्ञानगंगेने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
प्रवचन मालिकेदरम्यान स्वामीजींनी रामचरितमानसमधील विविध प्रसंगांचे अत्यंत सोप्या आणि भावपूर्ण भाषेत निरूपण केले. रामचरितमानस हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून ते एक उत्कृष्ट जीवनदर्शन आहे, असे प्रतिपादन स्वामीजींनी या वेळी केले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या आदर्शांना आजच्या आधुनिक जीवनाशी जोडताना त्यांनी त्याग, कर्तव्य, संयम आणि निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः तरुण पिढीला सत्संगाशी जोडण्याची नितांत गरज असून, पालकांनी मुलांवर सुसंस्कार करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सेंचुरी रेयान परिसरात स्वामीजींनी आपल्या भजन मंडळींसह श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त सुश्राव्य भजने सादर केली. या भजनांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. याप्रसंगी ओ. आर. चितलांगे आणि दिग्विजय पांडे यांनी स्वामीजींच्या मंत्रोच्चारात प्रभू श्रीरामांची विधिवत पूजा-अर्चा केली. सर्व भाविकांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी या वेळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
महाप्रसादाने सांगता
सात दिवस चाललेल्या या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. बिर्ला मंदिर आणि विठ्ठल मंदिर परिसरात हजारो भाविकांनी या प्रवचन सेवेचा लाभ घेतला. सेंचुरी रेयान प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. प्रवचनामुळे निर्माण झालेली आध्यात्मिक ऊर्जा आणि स्वामीजींचे मार्गदर्शन घेऊन भाविक तृप्त मनाने घरी परतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.