अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) : शहरात अवैध मटका जुगार व ‘चक्री’सारख्या धंद्यांविरोधात पोलिसांनी अलीकडेच कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई केवळ दिखाव्यापुरती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. शहरातील विविध भागांत जुगार अड्ड्यांविरोधात तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईची दुसऱ्या दिवशीही पुनरावृत्ती झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे शहराध्यक्ष संजय पृथ्वीराज प्रसाद यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देत अंबरनाथ पूर्व व पश्चिम भागातील अवैध जुगार व्यवसाय तत्काळ बंद करण्याची मागणी केली होती. त्यांच्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्वेकडील स्थानक परिसरातील कपिला बारजवळ; तसेच पश्चिमेकडील जोशी काका रिक्षा स्टँडमागे आणि संजय नगर परिसरात टीव्हीएम शाळेजवळ मटका जुगार खुलेआम सुरू होता. याचे व्हिडिओ पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या बेकायदा धंद्यांमुळे अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. शाळा परिसरात जुगार अड्डे सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची गंभीर बाब त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित ठिकाणी धाड टाकत कारवाई सुरू केली आहे. शहरातील सर्व जुगार अड्डे पूर्णतः बंद न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संजय पृथ्वीराज प्रसाद यांनी दिला आहे. शहरातील सर्व जुगार अड्डे तत्काळ बंद न झाल्यास १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी एसीपी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा तेजस सरवदे यांनी दिला आहे.
ऑनलाइन तक्रारीनंतर हालचाली
अवैध जुगार अड्ड्यांविरोधात यापूर्वी सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलिस उपआयुक्तांकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या; मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. अखेर पोलिस आयुक्त कार्यालयात ऑनलाइन तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. बुधवारी केलेली कारवाई ही केवळ औपचारिकता आहे. काही जणांना ताब्यात घेऊन अल्पावधीतच सोडून दिल्याने गुरुवारी पुन्हा शहरात जुगार अड्डे सुरू झाल्याचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तेजस सरवदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.