भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन गरजेचे
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे मत
मुंबई, ता. २८ : भारताच्या इतिहासाचे सत्य मांडण्यासाठी पुनर्लेखन गरजेचे आहे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ते शनिवारी (ता. २८) सकाळी आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लेखक अरविंद सिंह यांच्या ‘इंडियाज रोग हिस्टोरियन, हू फॉट अगेन्ट हिंदूज अँड लॉस्ट’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी आणि मान्यवर उपस्थित होते.
इतिहास अभ्यासक अरविंद सिंह यांच्या पुस्तकामध्ये रामजन्मभूमीचा ५०० वर्षांचा इतिहास आणि त्याद्वारे रचण्यात आलेले अपप्रचाराचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संशोधनाच्या प्रयत्नाची स्तुती केली आणि त्याचबरोबर असे प्रयत्न अधिकाधिक व्हायला हवेत, अशी अपेक्षा स्पष्टपणे बोलून दाखवली.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की इंग्रजांनी भारत सोडताना आपल्या मागे आपली विखारी विचारसरणी चालवण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी टाकली ती माणसे आता इतिहासकार बनून फिरत आहेत. अशा कथित इतिहासकारांनी भारताच्या सन्मानाच्या अनेक बाबी सर्वसामान्यांपासून दवडून ठेवल्या. रामजन्मभूमीच्या न्याय्य मागणीसाठी झालेला लढा याच कथित इतिहासकारांनी नकारात्मकदृष्ट्या समोर मांडला. अखेर तथ्याच्या आधारेच न्यायदान करीत सर्वोच्च न्यायालयाने सत्य स्वीकारले आणि न्याय देत हिंदू समाजाच्या भावनांचा स्वीकार केला. अशावेळी अरविंद सिंह यांचे पुस्तक मार्गदर्शक ठरते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद काथे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.