पनवेल महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
प्रशासकीय सुधारणांत राज्यात डंका; प्रशस्तीपत्र प्रदान
पनवेल, ता. २८ (बातमीदार) ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेने मोठी कामगिरी बजावली आहे. ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी प्लस या दोन्ही महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे हो सोहळा शनिवारी (ता. २८) पार पडला. पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
राज्यातल्या एकूण २९ महानगरपालिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. अनेक मोठ्या व अनुभवी महानगरपालिका स्पर्धेत असताना पनवेल महानगरपालिकेने आपला झेंडा फडकवला असून याबाबत पनवेलचे विशेष कौतुक होत आहे. मंगेश चितळे यांच्या नेतृत्वात परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे व संगणक विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या टीमने अथक मेहनत करीत हा बहुमान पटकावला आहे. पनवेल महानगरपालिकेने यापूर्वीही १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी बजावत तिसरा क्रमांक पटकावला होता.
इ गव्हर्नन्स कार्यक्रम
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामधे महानगरपालिकेचे संकेतस्थळ वापरण्यास सुलभ, सुरक्षित, अद्ययावत असणे; महानगरपालिकेचे डॅशबोर्ड विकसित करणे, आपले सरकार अंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सुलभतेने सेवा पुरवणे, कार्यालयात ई-ऑफिसचा प्रभावी वापर करणे, व्हॉटसॲप चॅटबॉट, एआयचा वापर करणे, जीआयएसचा वापर करणे अशा घटकांचा समावेश होता. आयुक्त मंगेश चितळे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर लगेचच कार्यालयात ई-ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सेवाकर्मी प्लस कार्यक्रम
१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये संपूर्ण राज्यातून २९ महानगरपालिकांमधून पनवेल महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरीता सेवाविषयक बाबींच्या गुणांकनाचा सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये आकृतिबंध मंजूर असणे, सेवाप्रवेश नियम मंजूर असणे, सेवाज्येष्ठता अद्ययावत करून प्रसिद्ध करणे, पदोन्नती पदांची स्थिती, सरळसेवा पदांची स्थिती, बिंदुनामवाली प्रमाणित असणे, अनुकंपा नियुक्त्या, सेवापुस्तक अद्ययावत करणे अशा नऊ मुद्द्यांवर आधारित मूल्यांकन झाले होते.
पनवेल महानगरपालिकेने मिळवलेले हे यश हे केवळ क्रमांकापुरते मर्यादित नसून प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुख सेवांचा परिणाम आहे. या यशामागे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समन्वय, परिश्रम आणि बांधिलकी आहे. भविष्यातही याच दिशेने अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पनवेल महानगरपालिका राज्यात आदर्श ठरेल, असा मला विश्वास आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.