अवजड वाहनांमुळे कोंडी
भिवंडी-कल्याण मार्गावर वाहनांच्या रांगा
भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली आणि कोनगाव हद्दीत अवजड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. नाशिक आणि गुजरातकडून नवी मुंबई व उरण बंदराकडे जाणारे कंटेनर या मार्गाचा वापर करीत असल्याने स्थानिक प्रवाशांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
सरवली परिसरात कापड आणि साड्यांचे मोठे मार्केट असून, येथे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करतात. यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दोन दिवसांपूर्वी रामनवमीनिमित्त रस्त्यालगतच्या मंदिरात भरलेल्या जत्रेमुळे या मार्गावर सुमारे अडीच तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीचा फायदा घेत रिक्षाचालक प्रवाशांकडून जादा भाडे उकळत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
सध्या आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि गॅसपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा काळात इंधनाचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असताना, भिवंडी-कल्याण मार्गावरील रोजच्या कोंडीमुळे लाखो लिटर इंधन वाया जात आहे. ही बाब पर्यावरणासोबतच अर्थव्यवस्थेसाठीही घातक ठरत असल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.
कंटेनर वाहतुकीला आळा घालणार
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासन आता आक्रमक झाले आहे. मुंबई-नाशिक महामार्ग उपलब्ध असतानाही अनेक अवजड वाहने कल्याणमार्गे जातात. यामुळे अंतर्गत रस्त्यांवर ताण येतो. या अवजड वाहतुकीला पर्यायी मार्ग सुचवणे किंवा वेळेचे निर्बंध घालण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
कोनगाव भागातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी लवकरच वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. तसेच या मार्गावरून कल्याणकडे जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीला आळा घालण्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल.
- शरद ओहोळ, सहाय्यक पोलिस आयुक्त, भिवंडी वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.