फेरीवाल्यांवरील कारवाईचा फटका
वाशी घाऊक बाजारात शेतमाल पडून, ७० टक्के खरेदीदार गायब; फळ-भाजीपाला कचऱ्यात, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : मुंबई आणि नवी मुंबईत सुरू असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाईचा थेट आणि गंभीर परिणाम वाशीतील घाऊक फळ व भाजीपाला बाजारावर दिसून येत आहे. बाजारातील सुमारे ७० टक्के खरेदीदार असलेले फेरीवालेच सध्या गायब झाल्याने मोठ्या प्रमाणात कृषी माल विक्रीअभावी पडून राहत असून, व्यापाऱ्यांवर तो कचऱ्यात टाकण्याची वेळ आली आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फळे आणि भाजीपाला झपाट्याने खराब होत असल्याने नुकसान अधिकच वाढले आहे. दररोज ६०० ते ६५० गाड्यांमधून भाजीपाला आणि ३५० ते ४०० गाड्यांमधून फळांची आवक होत असली तरी त्याला अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला असून, अनेकांनी काही काळासाठी विक्री थांबवली आहे. परिणामी घाऊक बाजारातील मुख्य खरेदीदारच अनुपस्थित राहिल्याने शेतमालाची विक्री साखळी कोलमडली आहे. सध्या केवळ ३० ते ४० टक्के मालच अधिकृत दुकाने आणि बाजारांमार्फत विक्रीस जात आहे.
मुंबई आणि नवी मुंबईतील दैनंदिन बाजारपेठांची अपुरी व्यवस्था आणि किरकोळ विक्रीसाठी फेरीवाल्यांवर अवलंबून असल्यामुळे या कारवाईचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. घाऊक व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले, की माल मोठ्या प्रमाणात येतोय, पण खरेदीदार नसल्याने तो पडून राहतो. उन्हामुळे खराब होऊन तो फेकावा लागतो. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.
चौकट
फेरीवाल्यांना पर्यायी जागेची मागणी
फेरीवाले विक्री करीत असलेला माल थेट शेतकऱ्यांकडून येत असल्याने त्याची विक्री न झाल्यास शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही फटका बसतो. त्यामुळे महापालिकांनी फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि कारवाई थांबवावी, अशी मागणी किरकोळ व्यापारी आणि फेरीवाले करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.