कॅप्टन खरात प्रकरणाविरोधात नवी मुंबईत जनक्षोभ
वाशीत २३ सामाजिक संघटनांचे तीव्र निदर्शन;
जादूटोणा विरोधी कायदा कडक करण्याची मागणी
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : भोंदूबाबा अशोक खरात याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी वाशी रेल्वे स्थानक परिसरात विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र निदर्शने केली. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला थारा देऊ नका, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या प्रकरणातील दोषींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय वरदहस्तावर कठोर कारवाईची मागणी केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), नवी मुंबई जिल्हा आणि परिसरातील तब्बल २३ समविचारी संघटनांनी एकत्र येऊन वाशी रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने केली. तसेच महिला व मुलींच्या शोषणाचा जाहीर निषेध अंधश्रध्दा भीतीतून आणि अज्ञानातून येते अशा आशयाचे फलक हातात धरून कार्यकर्त्यांनी जनजागृती केली. अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते अंधश्रद्धा, सत्तेचा गैरवापर आणि महिलांच्या शोषणाचे विदारक रुप आहे. समाजातील भीतीचा फायदा घेणाऱ्या अशा भोंदूबाबांना आळा घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही काळाची गरज आहे. अशा भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. केवळ खरातच नव्हे, तर राज्यभरात अशा प्रकारे सक्रिय असलेल्या सर्व भोंदूबांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी
खरात प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथकाद्वारे निष्पक्ष चौकशी व्हावी. जादूटोणा विरोधी कायद्याची रखडलेली नियमावली तातडीने पूर्ण करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. राजकीय पक्षांनी बुवा-बाबांशी संबंध ठेवू नयेत, यासाठी विशेष आचारसंहिता लागू करावी. पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना कायदेशीर मदत, मानसोपचार आणि सुरक्षा पुरवावी. फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या फलज्योतिषावर कायदेशीर लगाम लावावा. या मागण्यांचे सविस्तर निवेदन लवकरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला सादर केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.