नवी मुंबईत गोमांस तस्करांना मोक्का
पनवेल पोलिसांची टोळीप्रमुखासह चौघांवर मोठी कारवाई
पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गोमांस तस्करी करणाऱ्या टोळीवर पनवेल शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुह्यातील आरोपींनी संघटितपणे दहशत निर्माण करुन गोमांस तस्करीचे कृत्य सुरु ठेवल्याने या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गोमांस तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल शहर पोलिसांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी एक चारचाकी पकडली होती. या कारवाईत पोलिसांनी गोमांसासह दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, ही केवळ साधी तस्करी नसून एक मोठे रॅकेट असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी गोमांसच्या तस्करीचा टोळीप्रमुख यासीन मोईनुद्दीन शेख (३७), पासु उस्मान कुरेशी (४५), मोहंमद अली अकबर अली शाह (३०), आणि गोमांस पुरवठादार गुलाम गौस नसरुद्दीन मुकादम (३७) या चौघांना अटक केली. तपासादरम्यान टोळी प्रमुख यासीन शेख याने आपल्या साथीदारांसह परिसरात दहशत निर्माण केल्याचे आढळून आले. तसेच ही टोळी हिंसेचा वापर करुन, बेकायदेशीररीत्या आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कृत्य सातत्याने करत होते. या आरोपींवर इतर पोलिस ठाण्यांतही गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले.
त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी या टोळीवर मोक्काचा अंतर्भाव केला आहे. गुन्हेगारांनी संघटितपणे निर्माण केलेली दहशत आणि अवैध मार्ग मोडीत काढण्यासाठी नवी मुंबई पोलिस कटीबद्ध आहेत. या गुह्याचा पुढील तपास सुरु असून कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले करत आहेत.