पर्यावरणपूरक मूर्तिकारांना प्रोत्साहन
एक हजार टन शाडूची माती उपलब्ध करणार; नि:शुल्क मंडप परवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना यंदा एक हजार टनांहून अधिक शाडूची माती उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली. तसेच या मूर्तिकारांना तात्पुरते मंडप उभारण्यासाठी नि:शुल्क परवानगी दिली जाणार आहे. पालिकेकडे उपलब्ध जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनाच आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध केली जाणार आहे.
विविध परवानग्यांसाठी संगणकीय प्रणालीवर ‘एक खिडकी योजना’ शुक्रवारपासून (ता. २७) पालिकेच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे श्रीगणेशोत्सवासह नवरात्राेत्सवातील मूर्ती घडविण्यासाठीदेखील १० ऑक्टोबर २०२६पर्यंत महापालिकेच्या संकेतस्थळावर मूर्तिकार अर्ज करू शकणार आहेत. तसेच २० ऑक्टोबरपर्यंत या परवानगीची कालमर्यादा राहणार आहे.
एक खिडकी योजना
सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मूर्ती घडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्यासाठी परवानगीची प्रक्रिया एक खिडकी योजनेद्वारे संगणकीय प्रणालीमार्फत (ऑनलाइन) महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर विभागीय सहाय्यक आयुक्त व परिमंडळ उपआयुक्तांमार्फत पार पाडण्यात येणार आहे.
---
या गोष्टींची पूर्तता करावी
सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मंडपांसाठी अर्ज सादर करताना मागील वर्षांची परवानगीची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक असून संगणकीय प्रणालीद्वारे मिळालेला नवीन अर्ज तसेच त्यासोबतच्या कागदपत्रांची विभागस्तरावर छाननी करण्यात येणार आहे. योग्य पूर्ततेनंतर स्थानिक पोलिस ठाणे, वाहतूक विभागाचे ‘ना-हरकत’ इत्यादी संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त करण्यात येतील. त्यानंतर परिमंडळ उपआयुक्त, विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत मंडपासाठी परवानगी देण्यात येईल.
--
प्रति खड्डा दोन हजारांचा दंड!
मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते/फुटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मूर्तिकारांनी खड्डे न खणता तात्पुरत्या मंडप उभारणी तंत्राचा वापर करावा. खड्डे खणल्याचे आढळल्यास प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे.
---------------