गोबर गॅसला घरघर
गुरांची संख्या घटल्याने शेण मिळणेही कठीण
विक्रमगड, ता. २९ (बातमीदार) : ग्रामीण भागात घरगुती इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड थांबविण्यासाठी एकेकाळी शासनाने गोबर गॅस (बायोगॅस) या पर्यायाला प्रोत्साहन दिले होते. तेव्हा प्रत्येकांच्या घरात गोठे होते; पण गावातल्यांना शहराची ओढ लागली व घराघरातील गोठे कमी झाले. मग गुरांची संख्याही घटू लागली. त्यामुळे गुरांकडून मिळणारे शेणाचे प्रमाण घटल्याने त्याचे थेट परिणाम हा गोबर गॅसच्या निर्मितीवर झाला. सध्याच्या परिस्थितीत गोबर गॅस ग्रामीण भागासाठी एक नैसर्गिक देण ठरले असते; मात्र याच प्रकल्पाला गुरांचे शेणच उपलब्ध नसल्याने घरघर लागली आहे.
काही वर्षांपूर्वी इंधनासाठी सर्रास जंगले उद्ध्वस्त केली जायची. त्याला पर्याय म्हणून शासनाने शेतकरी व गुरेधारकांना अनुदानाच्या माध्यमातून गोबर गॅस प्रकल्प उपलब्ध करून दिला. गुरांच्या शेणापासून तयार होणारा हा गॅस स्वयंपाकासाठी तसेच घरगुती प्रकाशासाठी वापरला जाऊ लागला. कोकणातील अनेक तालुक्यांप्रमाणेच विक्रमगड तालुक्यातील सधन शेतकऱ्यांनीही या योजनेचा पुरेपूर लाभ घेतला. तेव्हा गावागावांत या प्रकल्पाची संख्या मोठी होती; मात्र ग्रामीण भागात एलपीजी गॅसने शिरकाव केला व या कष्टाच्या योजनेकडे हळूहळू दुर्लक्ष होत गेले. त्याला कारणेही अनेक होती. गुरांची संख्या कमी. अशात शेणाची टंचाई. त्यात विविध अडचणी यामुळे हे गोबर गॅस प्रकल्प टिकवणे अनेकांसाठी कठीण झाले.
एका सामान्य कुटुंबासाठी गोबर गॅस हवा असल्यास किमान चार ते पाच घमेली शेण गरजेचे असते; मात्र गुरांचा वाढता खर्च पाहता, गुरांची कमी झालेल्या संख्येमुळे एवढे शेण मिळणे कठीण होऊन बसते. परिणामी, अनेक गोबर गॅस प्रकल्पांना त्याचा फटका बसला.
------------
दुसरीकडे, जंगलतोडही काही कमी झाली नाही. पावसाळ्याआधी ती नित्यनेमाने वाढतच राहिला. जंगलतोड झाल्याने गुरांसाठी चारा मिळणेही कठीण झाले. अशात या प्रकल्पाला टिकवण्यासाठी शासनाने म्हणावे तशी खबरदारी न घेतल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा होता, कारण यातून त्यांना सेंद्रिय खतही प्राप्त होत होते; मात्र प्रकल्प ठप्प झाल्याने त्यांना इतर खतांवर अवलंबून राहावे लागले.
-----------------
गुरांचे प्रमाण कमी होण्यामागे महागाई हे मुख्य कारण आहे. पूर्वी चार-पाच हजारांत मिळणारे बैल, गाय किंवा म्हैस आता २० ते २५ हजारांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांचा चारा, औषधे आणि देखभाल खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, गोबर गॅसवर शिजवलेले अन्न अधिक चविष्ट असते. वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर गोबर गॅस हा चांगला पर्याय आहे.
- विजय सांबरे, शेतकरी, विक्रमगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.