उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
पालघर, ता. २९ (बातमीदार) : जिल्हा परिषद पालघरमार्फत गोवर्धन इको व्हिलेज, गालतरे येथे आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालविकास विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात पार पडला. विविध संवर्गांतील आदर्श आशा पर्यवेक्षिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास व्यंकटराव हुंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरणात शिक्षण विभागांतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक अशा एकूण आठ जणांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त उमेश खिराडे, महादेव इरकर व आनंद आन्नेमवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा कोटबी बुजडपाडा येथील शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.
महिला व बालविकास विभागांतर्गत १२ प्रकल्पांमधून प्रत्येक प्रकल्पासाठी एक मुख्य सेविका तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या तीन सेविका आणि तीन मदतनीस अशा एकूण सहा जणांना प्रति प्रकल्प पुरस्कार देण्यात आले. आरोग्य विभागांतर्गत आशा कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय सहा व तालुकास्तरीय २४ पुरस्कार देण्यात आले. ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कारांतर्गत पाच संवर्गांमध्ये १५ जणांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक तालुक्यातील १३ संवर्गांमधून प्रत्येकी एक अशा एकूण १०४ कर्मचाऱ्यांचा आणि जिल्हास्तरीय सहा कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या प्रतिपादनात शिक्षक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका हे प्रशासनाचे महत्त्वाचे अंग असल्याचे सांगून त्यांच्या सातत्यपूर्ण व निष्ठावान कार्यामुळेच जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळत असून, समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे नमूद केले. विकासकामांतील उणिवा ओळखून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवल्यास पालघर जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान बालविवाह प्रतिबंधाबाबत सर्व उपस्थितांनी शपथ घेत सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ केली. या वेळी तिन्ही विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.