कचरा उचलण्यासाठी‘एक दिवसाआडचे’ धोरण
ठेकेदाराचा मनमानी कारभार; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पनवेल, ता. २९ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कचरा संकलनाच्या ठेकेदाराने अवलंबलेल्या ‘एक दिवसाआड कचरा उचलण्याच्या’ धोरणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. खारघर, कामोठे, कळंबोली आणि रोडपाली परिसरातील अनेक वसाहतींमध्ये कचऱ्याचे डबे ओसंडून वाहताना दिसत असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दररोज कचरा उचलल्यास वाहनांच्या फेऱ्या वाढतात आणि वजनाची पूर्तता होत नाही, या कारणास्तव ठेकेदाराने एक दिवसाआड कचरा उचलण्याची पद्धत अवलंबली आहे. मात्र, या धोरणाचा फटका थेट नागरिकांना बसत असून, महिन्यातील सुमारे पंधरा दिवस कचरा साचून राहत आहे. परिणामी, डासांची संख्या वाढत असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत अनेकदा तक्रारीही केल्या असून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाचे वातावरण आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा वेळेवर उचलला गेला नाही तर परिसराची स्वच्छता बिघडतेच, शिवाय मुलांचे व ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात येते. दररोज कचरा उचलला गेला पाहिजे, ही मूलभूत अपेक्षा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आमच्या वसाहती कचराकुंड्यांमध्ये बदलल्या आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया काही रहिवाशांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर लगाम घालण्याची मागणी केली आहे.
दिवसाआड कचरा उचलला जातो. त्यामुळे सोसायटीमधील कचऱ्याचे डबे ओसांडून वाहतात. परिणामी, सोसायटीमधील कचरा भरण्यासाठी डबे नसल्याने दोन-दोन दिवस घरातील कचरा उचलला जात नाही. पनवेल पालिकेने दररोज घंटागाडी कचरा उचलण्यास पाठवावी.
- तुषार निढाळकर, रहिवाशी, कळंबोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.