गॅस तुटवड्याचा तीव्र परिणाम
हॉटेल व्यवसाय डगमगला, दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त
वाशी, ता. २९ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे हॉटेल व खाणावळी व्यवसायावर मोठे संकट ओढावले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने अनेक हॉटेलला वेळेवर गॅस उपलब्ध होत नाही. परिणामी काही हॉटेल अंशतः बंद ठेवावी लागत आहेत, तर काही ठिकाणी पूर्णपणे शटर खाली करण्याची वेळ आली आहे.
या तुटवड्याचा थेट परिणाम हॉटेलच्या दैनंदिन कामकाजावर होत असून, मेन्यू कार्डमधील अनेक पदार्थ हटवण्यात आले आहेत. विशेषतः गॅसवर अवलंबून असलेले तळलेले पदार्थ, स्नॅक्स आणि काही मुख्य जेवणाचे पदार्थ पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्राहकांची निराशा होत आहे. बाजारात सिलिंडरची कमतरता असल्याने काही ठिकाणी काळाबाजार वाढल्याचेही समोर आले आहे. अधिकृत दरापेक्षा अनेक पटीने जास्त दर मोजून व्यावसायिकांना सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. सध्या एक व्यावसायिक सिलिंडर तब्बल पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.
या वाढत्या खर्चामुळे हॉटेलचालकांवर आर्थिक ताण वाढला असून, तो ताण कमी करण्यासाठी अनेकांनी मेन्यूमधील पदार्थांच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांनी वाढ केली आहे. काही ठिकाणी तर कमी मागणी असलेले किंवा जास्त गॅस लागणारे पदार्थ पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. गॅस तुटवड्यामुळे नवी मुंबईतील हॉटेल उद्योग संकटात सापडला असून, याचा परिणाम थेट ग्राहकांवरही होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत न केल्यास येत्या काळात अनेक हॉटेल बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बॉक्स
हॉटेल व्यावसायिकांची प्रतिक्रिया
गॅस आमच्या व्यवसायाचा कणा आहे. सिलिंडरच मिळत नसेल तर व्यवसाय कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे. ग्राहकांना परत पाठवावे लागते. काळ्याबाजारातून महागात सिलिंडर घ्यावा लागतोय. रोजचा खर्च प्रचंड वाढला आहे. आम्हाला दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.
- रोहित सुर्वे, हॉटल व्यावसायिक
बॉक्स
आम्ही नेहमी येणाऱ्या हॉटेलमध्ये गेल्यावर अनेक पदार्थ मिळत नाहीत. जे मिळतात त्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे बाहेर जेवणे आता महाग झाले आहे. हॉटेलवाल्यांची अडचण समजू शकते, पण ग्राहकांवरही याचा ताण येतो आहे. कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाणे आता खर्चीक झाले आहे.
- सनी धुमाळ, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.