उलवे येथे सिडकोची मोठी कारवाई
४,४०० चौ. मी. भूखंडावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित
उलवे, ता. ३० (बातमीदार) ः सिडकोने पुष्पक नोडमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत सुमारे ४,४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड मोकळा केला आहे. बुधवारी (ता. २५) पार पडलेल्या या मोहिमेत बेकायदेशीररीत्या उभारलेले आरएमसी प्लांट आणि इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या.
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत पुष्पक येथील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. जेसीबी व पोकलनच्या सहाय्याने ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई सिडकोचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पोलिस, पोलिस पथक, सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या संयुक्त सहभागातून पार पडली. या कारवाईत आरएमसी प्लांट, क्रशर, मिक्सर मशीन, प्रशासकीय इमारत, टॉयलेट ब्लॉक, वॉचमन केबिन आणि पत्र्याच्या शेडसह इतर बांधकामांचा समावेश होता.
डम्परचालकाविरोधात गुन्हा
सिडकोने संपादित केलेल्या जमिनीवर अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्याच्या प्रकारांवरही कारवाई करण्यात आली. एका डम्परद्वारे सिडकोच्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात येत होते. या डम्परचालकाला पोलिसांनी सापळा लावत ताब्यात घेतले आहे. या चालकाविरुद्ध उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित जमीन ही भूमी संपादन अधिनियम १८९४ अंतर्गत ‘नवी मुंबई प्रकल्पा’साठी संपादित असून, तिचा वापर नियोजित विकासासाठी निश्चित केलेला आहे. अशा जागांवर कोणतीही परवानगी न घेता उभारलेली बांधकामे बेकायदेशीर ठरतात. संबंधितांना नोटीस देऊन स्वतःहून बांधकाम काढण्याची संधी दिली जाते. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करून बांधकाम पाडण्यात येते व यंत्रसामग्री जप्त केली जाऊ शकते.
- भरत ठाकूर, नियंत्रक अनधिकृत बांधकामे (दक्षिण-२) तथा पदनिर्देशित अधिकारी