कचऱ्याच्या आगींनी ठाणे धगधगतोय; तीन महिन्यांत २२५ घटनांची नोंद
सकाळ वृत्तसेवा / पंकज रोडेकर
ठाणे, ता. ३० : ठाणे शहरात या वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत आगीच्या घटनांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. १ जानेवारी ते २६ मार्चदरम्यान तब्बल २२५ आगीच्या घटनांची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेत झाली आहे. त्यामध्ये धक्कादायक म्हणजे निम्म्याहून अधिक ११७ घटना कचऱ्याला लागलेल्या आगीच्या असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे ‘कचरा पेटतोय की पेटवला जातोय,’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शहरात वाढत्या कचऱ्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यातच कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आगींचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः उघड्यावर टाकलेला कचरा, डम्पिंग ग्राउंड परिसर आणि रिकाम्या जागांवरील साचलेला कचरा हे आगींसाठी पोषक ठरत आहेत. २०२६ या वर्षाच्या जानेवारी महिन्यात कचऱ्याला लागलेल्या आगींच्या तब्बल ४६ घटना नोंदवल्या गेल्या आहेत, तर फेब्रुवारीत २९ आणि मार्चमध्ये पुन्हा ४२ घटनांची नोंद झाली. या आकडेवारीवरून समस्या कायम असल्याचे बोलले जात आहे. आगींच्या या मालिकेत जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत सहा जण जखमी झाले असून, दुसरीकडे ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षेने वेळीच धाव घेत तब्बल ९५ नागरिकांना मृत्यूच्या दारातून सुरक्षित बाहेर काढले आहे. सुदैवाची बाब म्हणजे, इतक्या घटनांनंतरही एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. एकूण आगीच्या घटनांच्या आकडेवारीवरून सरासरी दिवसाला ठाणे शहरात दोन ते तीन घटनांची नोंद होत आहे.
दरम्यान, कचरा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे या घटना वाढत असल्याची चर्चा रंगली असून, काही ठिकाणी जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनासमोर कचरा व्यवस्थापनासोबतच आगींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. वाढत्या घटनांमुळे अग्निशमन दल अधिक सतर्क झाले असून, नागरिकांनीही कचरा जाळणे टाळावे व संशयास्पद हालचाली त्वरित कळवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
* या वर्षातील आगीच्या घटनांचा तक्ता
महिना आग/ जखमी /सुखरूप सुटका / कचऱ्याला आग
जानेवारी ७५/०१/००/४६
फेब्रुवारी ८२/०५/९५/२९
मार्च ९५/००/००/४२
एकूण २२५/०६/९५/११७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.