सारसोळे डेपोचे प्रवेशद्वार अचानक बंद
प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण
जुईनगर, ता. ३० (बातमीदार) : सरसोळे बस डेपोचे प्रवेशद्वार कोणतीही पूर्वसूचना न देत बंद केले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरसोळे गावाकडील मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने रोजच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनधिकृत पार्किंग, कॅन्टीनचालकाचा मनमानी कारभार अशा विविध समस्यांमुळे प्रवासीवर्ग आधीपासूनच त्रस्त होता. मात्र, आगाराचे थेट प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. दररोज प्रवास करणारे प्रवासी अचानक बदललेल्या व्यवस्थेमुळे गोंधळून गेले आहेत. प्रवेशद्वार बंदबाबत कोणतीही माहिती किंवा सूचना न दिल्यामुळे अनेक प्रवाशांना बस नेमकी कुठून येणार, आगारात प्रवेश कसा करायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, नवी मुंबईसारख्या नियोजित शहरात अशा प्रकारचा कारभार अपेक्षित नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. सरसोळे डेपोतील वाढत्या समस्यांमुळे संयम सुटू लागला असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही.