पाण्यासाठी जनक्षोभ उसळला
विठ्ठलवाडी ‘ड’ प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : ‘कर भरतो वेळेवर, पाणी द्या नळावर’ अशा संतप्त घोषणा देत विठ्ठलवाडी, खडेगोळवली, नेहरूनगर आणि कैलासनगर परिसरातील हजारो नागरिकांनी सोमवारी (ता. ३०) कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला. गेल्या दोन महिन्यांपासून थेंब थेंब पाण्यासाठी तडफडावे लागत असल्याने नागरिकांचा संयम सुटला असून, प्रशासकीय दिरंगाईचा पाढा या वेळी वाचण्यात आला.
उन्हाळ्याचा तडाखा वाढलेला असतानाच पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. घरात वृद्ध, रुग्ण आणि लहान मुले असतानाही पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून, नोकरीवर जाणाऱ्यांचे वेळापत्रकही या टंचाईमुळे कोलमडले आहे. वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
टँकरमाफियांचा संशय
आंदोलनादरम्यान लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर खळबळजनक आरोप केले आहेत. कल्याण पूर्वेच्या हक्काचे पाणी गोविंदवाडी येथील ढाब्यांना आणि इतर व्यावसायिक ठिकाणी वळवले जात असून, अधिकारी त्या बदल्यात हप्ते वसूल करीत असल्याचा दावा माजी नगरसेवकांनी केला आहे. टँकरमाफियांच्या फायद्यासाठी मुद्दाम पाणी दाब कमी ठेवला जातोय का, असा संशयही नागरिकांनी व्यक्त केला आहे. केवळ कल्याण पूर्वेलाच सावत्र वागणूक का, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला.
प्रशासनाचे स्पष्टीकरण
पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कल्याण पूर्वेला बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी येते. उन्हाळ्यामुळे नदीची पातळी खालावली असून, केंद्रातूनच पाण्याचा दाब कमी मिळत आहे. दाब कमी असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.
तीव्र आंदोलनाचा इशारा
सोमवारी सकाळी ११ वाजता निघालेल्या या मोर्चाने ‘ड’ प्रभाग कार्यालयाला घेराव घातला. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आणि लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. प्रशासनाने तातडीने मार्ग न काढल्यास यापेक्षाही तीव्र लढा उभारण्याचा इशारा विठ्ठलवाडीकरांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.