स्वरांचा साज, आठवणींचा नाद
पं. प्रभाकर कारेकरांना भावपूर्ण अभिवादन
ठाणे, ता. ३० (बातमीदार) : संगीताच्या सुरांनी भारलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ ‘मर्मबंधातील ठेव’ या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाली. ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या बहुआयामी गायकीचा सुरेल जागर करण्यात आला.
विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने आणि नगरसेवक संजय वाघुले यांच्या पुढाकाराने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, प्रसिद्ध गायक व कारेकर बुवांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सुरेश बापट, अमित प्रभाकर कारेकर, संजय वाघुले, भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे, पदाधिकारी वृषाली वाघुले-भोसले यांनी दीपप्रज्वलन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित सुरेश बापट यांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ या नाट्यगीताने झाली. त्यानंतर ‘धन्य आनंद दिन’, ‘राम होऊनी राम गा रे’, ‘बोलावा विठ्ठल’ आणि ‘या कागदी फुलांच्या’ अशा विविध गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कारेकर बुवांच्या गायकीतील ठुमरी, अभंग, नाट्यसंगीत आणि भैरवीतील नजाकतींचे विशेष स्मरण करण्यात आले. त्यांच्या साधनेबद्दल सांगताना सुरुवातीला साधा आवाज असतानाही अथक रियाझमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, अशी आठवण निवेदिका अनघा मोडक यांनी सांगितली.
‘प्रिये पाहा’ या नाट्यगीताने मैफिलीला उंचीवर नेल्यानंतर ‘मै कही समझाऊं सब जग अंधा’ या भैरवीने कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू गाठला. या वेळी सतीश दुभाषी यांच्याशी संबंधित भावस्पर्शी आठवण सांगण्यात आली, ज्याने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. या कार्यक्रमात श्रीरंग भावे, ओमकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी आणि संदेश खेडेकर यांनीही गायन सादर केले. वादकांनीही उत्तम साथ देत संध्याकाळ अधिक रंगतदार केली. हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली नव्हता, तर संगीताच्या माध्यमातून एका महान कलाकाराच्या स्मृतींना दिलेला सुरेल सलाम होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.