पालघरमध्ये उभारणार खारफुटीचे उद्यान
जिल्हा पुरस्कार वितरण सोहळ्यात नाईक यांचे प्रतिपादन
पालघर, ता. ३० (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी, वनराई पुरस्कार वितरण आज पार पडले. या कार्यक्रमासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. या वेळी त्यांनी पालघर येथे खारफुटी उद्यान उभारण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यात पर्यटन विकासासोबतच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा महत्त्वाचा निर्णयही त्यांनी या वेळी घेतला. या कार्यक्रमात उत्कृष्ट ग्रामपंचायत व त्यांचे अधिकारी सरपंच यांचाही सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यात २.३६ कोटी रुपये किमतीचे एक हजार १२८ वनराई बंधारे सामाजिक दायित्व फंड अथवा लोकसहभागातून मांडण्यात आले. त्यामुळे ५६६ सिंचन प्रकल्प उभारण्यात येऊन ९७६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. माझी वसुंधरा या राज्य शासनाच्या अभियानात पालघर जिल्ह्यातील नावझे ग्रामपंचायतीला राज्यातील प्रथम पुरस्कार व खाणीवली या गावालाही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दिली.
सर्व कर्मचाऱ्यांनी समाजाची सेवा करावी, समाजातील प्रत्येक व्यक्ती चिंतामुक्त असावा, अशी अपेक्षा पालकमंत्री गणेश नाईक यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. परिसराच्या विकासात जनमानसांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याने त्यांनी सांगितले. वन विभागामार्फत राज्यात होणारी ३०० कोटी वृक्षांची लागवड तसेच पालघर जिल्ह्यात तीन ठिकाणी खारफुटी उड्डाण उभारणी बाबतही त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपस्थित होते याप्रसंगी २०२२-२३ ते २०२५-२६ या तीन वर्षाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार तसेच वनराई बंधारे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत होणाऱ्या चांगल्या कामाबद्दल कौतुक आहे. जिल्हा नियोजन समिती मधील ९९ टक्के निधी वितरित झाला आहे. हा निधी समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले असून, जिल्ह्यातील ठेकेदारांचे दायित्व यंदा संपवले आहे. ग्रामपंचायत समृद्ध झाली तरच देशाची प्रगती होऊ शकते, हे दिसून आले आहे.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी
विकल्प वितरित व अंतर जिल्हा बदली अंतर्गत शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर ‘कंत्राटी’ शिक्षक भरती, ‘पेसा’ शिक्षक भरती मुळे शैक्षणिक व्यवस्थेला स्थैर्य लाभले. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतून ७१ हजार घरकुलांची उभारणी होत असून, या सर्वांना सौरऊर्जेची जोड देण्याचा प्रयत्न आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील विविध विभागात ७२० वेरी भरण्याचे काम सुरू केले आहे. त्याला सौरपंप देण्याची देखील योजना राबवण्यात येत आहे.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.